खामगाव,
hanuman jayanti श्री महाबली हनुमान ट्रस्ट जनुना यांच्या माध्यमातून खामगाव - अकोला मार्गावरील पाटबंधारे वसाहती जवळ २ एकराच्या जागेवर गत 27 वर्षांपूर्वी 41 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यंदा २ एप्रिल 26 रोजी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे २ वर्ष वगळता गेल्या २५ वर्षापासून या ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात येत आहे. नांदुरा येथे 105 फुटाच्या बजरंग बलीच्या मूर्तीचा पहिला नंबर तर खामगाव येथील 41 फूट उंचीच्या हनुमान जी च्या मूर्तीचा दुसरा नंबर लागतो दर शनिवारी या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी दिसून येते.
अशोक भिसे यांना दृष्टांत
येथील भिसे प्लॉट भागात राहणारे श्री संत गजानन महाराजांवर अगादश्रद्धा असलेले अशोक नारायण भिसे हे श्रीच्या मंदिरात सेवाधारी म्हणून काम करीत असतांना त्यांना 1992 साली श्री गजानन महाराजांनी दृष्टांत दिला आणि सांगितले की मोठ्या बजरंगबलीच्या मूर्तीची उभारणी कर त्यानुसार त्यांनी येथील शंकरनगर भागातील वीर हनुमान मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ही माहिती दिली. पदाधिकाऱ्यांनी मूर्ती उभारणीला संमती दिली आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सन 1992 ते 1996 पर्यंत अशोक भिसे यांनी वीर हनुमान मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि त्यांनी या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना व हनुमान भक्तांना सोबत घेऊन श्री महाबली हनुमान ट्रस्ट जनुना ची स्थापना केली आणि या ट्रस्टचे रजिस्ट्रेशन केले. मूर्ती कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयातील मूर्तिकार वसंत झाडोकार यांची भिसे यांनी भेट घेऊन 41 फूट उंचीची बजरंगबली ची मूर्ती तयार करण्याचे सांगितले त्यानुसार झाडोकार यांनी सुरेश पवार,बाबुराव लांडे,वामनराव हिवराळे आदींच्या मदतीने ही मूर्ती साकारली. त्यासाठी त्यांना ४ वर्षाचा कालावधी लागला सिमेंट काँक्रीटचा उपयोग करून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या मूर्तीवर काही एक परिणाम होत नाही.
2 एकर जागा दान
ज्या जागेवर ही मूर्ती उभारण्यात आली आहे ती 2 एकर जागा अशोक भिसे यांनी श्री महाबली हनुमान ट्रस्ट जनुना यांना दान दिली आहे. या जागेवर 41 फुटाच्या बजरंगबली च्या मूर्तीची 1999 साली स्थापना करण्यात आली आहे.पौरोहित्याचे काम रमेश महाराज ओझा यांनी केले होते.hanuman jayanti हनुमान जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री महाबली हनुमान ट्रस्ट जनुन्याचे अध्यक्ष अशोक भिसे, उपाध्यक्ष डॉ. निखिल लाटा, सचिव आकाश अग्रवाल,सदस्य अमोल डांगे, कुणाल भिसे, सुनील जामोदे, दत्तात्रय देवधर व अनिल देशमुख हे परिश्रम घेत आहे.