नांदेड,
Famous Kirtankar crushed by car नांदेडमध्ये एक हृदयद्रावक अपघात घडला असून समाजप्रबोधन करणाऱ्या कीर्तनकाराचा दुर्दैवी अंत झाला आहे. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण करणारे ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर यांना भरधाव धावणाऱ्या जड वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सिडको परिसरात ही घटना घडली. कंधार तालुक्यातील बारूळ गावचे रहिवासी असलेले मधुकर महाराज अनेक वर्षांपासून वारकरी परंपरेत कार्यरत होते. ते वारकरी परिषदेच्या माध्यमातून समाजात प्रबोधनाचे काम करत होते आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. त्या दिवशी सिडको परिसरात झालेल्या बैठकीला उपस्थित राहून ते दुचाकीवरून आपल्या गावी परतत होते.

दरम्यान रुबी हॉटेलजवळ पोहोचताच मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ते थेट वाहनाखाली सापडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, मात्र अपघातानंतर चालकाने गर्दीचा फायदा घेत तेथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत आहे. शहरात जड वाहनांवर बंदी असतानाही अशा वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः सिडको आणि हडको भागात रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करून जड वाहनांवर कायमस्वरूपी निर्बंध आणावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.