शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर मुलाला संधी!

01 Apr 2026 12:09:19
पुणे,
Opportunity for Shivajirao Kardile's son राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. माजी आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती आणि त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. कर्डिले कुटुंबाचा स्थानिक प्रभाव लक्षात घेऊन पक्षाने अक्षय कर्डिले यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे. दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या मुलाला संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय स्तरावर रंगली आहे. राहुरी मतदारसंघात कर्डिले घराण्याचा प्रभाव मोठा मानला जातो, त्यामुळे या निर्णयामुळे निवडणुकीत रंगत वाढणार असल्याचे चित्र आहे. आता विरोधी पक्ष कोणता उमेदवार देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
Opportunity for Shivajirao Kardile
 
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात शिवाजीराव कर्डिले यांचे स्थान विशेष होते. राजकीय डावपेचांमध्ये प्राविण्य असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. बदलत्या राजकीय परिस्थितीतही आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच भाजप या दोन्ही पक्षांत काम करत विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते आणि राहुरीत दीर्घकाळ प्रभाव राखला होता. राजकारणासोबतच सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा मोठा सहभाग होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात विकासकामे उभी केली. सामान्य माणसांशी जोडलेला नेता अशी त्यांची प्रतिमा होती.
 
बुऱ्हाणनगर येथून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली आणि सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार व मंत्रीपदापर्यंत मजल मारली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत यशासोबत अपयशाचाही सामना त्यांनी केला. २००९ साली अपक्ष म्हणून विजय मिळवत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली, मात्र त्यात पराभव पत्करावा लागला. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला, तर २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दूध व्यवसायातून त्यांनी आपली कारकीर्द सुरू करत समाजात आणि राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान, त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींयांनी राहुरीत जाहीर सभा घेतल्यामुळे त्यांचा प्रभाव अधोरेखित झाला होता. आता त्यांच्या निधनानंतर अक्षय कर्डिले यांच्या रूपाने या घराण्याचा नवा चेहरा पुढे आला आहे. या उमेदवारीमुळे राहुरी पोटनिवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता असून, मतदार पुन्हा कर्डिले कुटुंबावर विश्वास दाखवतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0