अखाद्य वनस्पतींचे जंगलातील वास्तव!

01 Apr 2026 06:00:00
वेध
विजय निचकवडे
inedible plants आम्ही काल्पनिक जगात अधिक रमतो. म्हणून तर असं केलं तर तसं होईल आणि आपला हेतू साध्य होईल, यावर आमचा दृढ विश्वास असतो. पण खरंच आपण जे करायचं, त्यावर लक्ष केंद्रित करून काम करतो का हो? हे एवढ्यासाठीच म्हणावसं वाटतं, कारण मानव आणि हिंस्र प्राणी संघर्ष हे न सुटलेले कोडे असल्यागत चर्चेची गुऱ्हाळे रंगतात आणि त्या मंथनातून निघतो, तो कोंबड्या, बकऱ्या सोडण्याचा सार! हे किती वास्तवाशी सुसंगत हा प्रश्नच आहे. पण या मंथनात जंगलातील अखाद्य वनस्पतींमुळे खंडीत होत चाललेली अन्न साखळी आणि त्याचे दुष्परिणाम यांना जागा नसेल तर वन आणि व्याघ्र संवर्धन न संपणाराच विषय आहे.
 

अखाद्य वनस्पतींचे जंगलातील वास्तव! 
 
 
वास्तवाची जाणीव ठेवून केलेल्या कार्याच्या सफलतेचे प्रमाण नक्कीच चार भिंतींच्या आड बसून केलेल्या नियोजनापेक्षा अधिकच असते. आमच्या बाबतीतील अनेक गोष्टींचे नियोजन दूर कुठेतरी बसलेले प्रशासनातील अधिकारी करतात. लोकप्रतिनिधी, राज्यकर्त्यांचा त्याला दुजोरा असतो आणि मग कागदे रंगविली जातात. मानव आणि जंगलातील हिंस्र प्राणी हा संघर्ष वर्षानुवर्ष चालत आलेला विषय आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत जंगलाच्या बाहेर न भटकणारा प्राणी आता थेट गावात काय, लोेकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. बिबट गावात आल्याच्या आणि वाघाने शेतात येऊन मानवाचा बळी घेतल्याच्या घटना नवीन नाहीत. मग आम्ही अनेक वर्षांपासून हा संघर्ष संपावा म्हणून रंगविलेल्या कागदांचे काय? त्याचे निघालेले फलित काय, असा प्रश्न उपस्थित केला गेला तर उत्तर शून्यच म्हणावे लागेल. आठवडाभरात दोन घटना घडल्या. यात एकाचा जीव गेला. एक महिला मृत्यूशी झुंज देत आहे. त्यांचा दोष काय तर ते शेतात काम करीत होते. तिथे वाघोबा आले आणि हल्ला केला? वाघ गावाकडे का आला किंवा येतो, याची अनेक कारणे असतील. ती शोधून त्यावर उपाययोजनाही होतात. म्हणून बिबट, वाघ जंगलाच राहावे म्हणून बकèया जंगलात सोडण्याची कल्पना आमच्या मंत्रिमहोदयांच्या डोक्यात येते आणि त्यावर चर्चाही रंगतात. हे किती वास्तवाला धरून परिस्थिती सापेक्ष आहे, हे यासाठी आपल्या कल्पनेचा विस्तार करणाèयांनाच माहीत. पण कधी वस्तुस्थितीचा विचार नियोजन करताना होतो का हो?
 
जंगलात एक अन्न साखळी असते. तृणभक्षी प्राणी म्हणजे हरीण, सांबार, नीलगाय, गवा हे जंगलात वाढणारे गवत म्हणजेच तृण खाऊन जागतात. त्यांची शिकार करून वाघ, बिबट यासारखे हिंस्र प्राणी आपली उपजीविका चालवितात. आज नवेगाव, नागझिरा, ताडोबा या राष्ट्रीय दर्जाच्या व्याघ्र प्रकल्पांची अवस्था काय? खरंच तेथे तृणभक्षी प्राण्यांसाठी अन्न शिल्लक आहे का? आज शाकाहारी प्राण्यांसाठीच्या गवताची जागा अखाद्य वनस्पतींनी घेतली. ताडोबात लॅटोना कॅमेरा, युपॅरोशियम अशा अखाद्य विषारी वनस्पती फोफावल्या. नवेगाव-नागझिरा प्रकल्पात रान तुळस, महाडोर, तरोटा यांनी आपले अस्तित्व निर्माण करून तृणाला हद्दपार केले. कधीकाळी 10 ते 12 टक्के असलेल्या या वनस्पतींनी आपले साम्राज्य एवढे वाढविले की, आज व्याघ्र प्रकल्पाचा 60 ते 70 टक्के भाग याच वनस्पतींनी काबीज केला. परिणामी तृणभक्षींचे अन्न संपले आणि तृणभक्षी प्राणीही! गवत नसल्याने त्याचे दुष्परिणाम शाकाहारी प्राण्यांवर झाले. त्यांची संख्या कमी झाली. परिणामी वाघ-बिबटच्या अन्नाचा प्रश्न निर्माण होऊन नाईलाजाने हे प्राणी पाळीव असलेल्या गाय-म्हैस या गावातील प्राण्यांकडे आणि मानवावर हल्ला करण्याकडे वळले. अन्न साखळी विस्कळीत झाली आणि पर्यावरणाचे चक्रही फिरले. भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पांमध्ये या अखाद्य वनस्पतींनी वाढविलेला व्याप आज व्याघ्र आणि वनसंवर्धनासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. अशा अखाद्य वनस्पती नवेगाव-नागझिरा प्रकल्पातून समूळ नष्ट करण्याची मागणी काही वर्षांपूर्वी एका संघटनेने केली खरी; पण हजारो किलोमीटर दूर, चार भिंतीत बसलेल्या प्रशासनातील अधिकाèयांना तो विषय निरर्थक वाटला असावा. मात्र आज जेव्हा एका व्याघ्र प्रकल्पातून नागझिरा अभयारण्यात 500 हरीण आणण्याचा निर्णय घेतला गेला, तेव्हा त्याचे महत्त्व नक्कीच पटले असावे!
 
अखाद्य वनस्पतीमुळे तृणभक्षींना मिळणारे पोषक मूल्य संपले. अशा वनस्पतींची घनता वाढल्याने जंगलात प्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न उपस्थित झाला. ज्यांचा काहीच उपयोग नाही, अशा वनस्पतीला आम्ही गोंजारत असताना दुसरीकडे मात्र आमची जैवविविधता नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.inedible plants विचारांचे स्वातंत्र्य आम्हाला आहे. यातूनच नवनवीन कल्पना उदयास येतात. हे करताना अनेक समस्यांचे मूळ काय? याचेही मंथन होणे गरजेचे आहे. नाहीतरी भविष्यात आम्हाला अखाद्य वनस्पतीच्या जंगलात जंगल पर्यटन करण्याची वेळ येईल आणि प्राण्यांसाठी गावाच्या शेजारी निवारे उभे करावे लागतील.
 
9763713417
 
....
Powered By Sangraha 9.0