मुंबई
Mumbai drug bust मुंबईत अमली पदार्थांचा अवैध व्यापार करून गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ३५ वर्षीय महिला तस्कराला अखेर टिटवाळा परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्या घरातून तब्बल ५ कोटी ७ लाख रुपये किंमतीच्या एमडी (एक्स्टेसी) गोळ्या जप्त केल्या असून, या कारवाईमुळे टिटवाळा आणि कल्याण ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या मोठ्या ड्रग्ज कारवाईदरम्यान या महिलेचे नाव मुख्य पुरवठादार म्हणून समोर आले होते. त्यानंतर ती फरार झाली होती. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तिने टिटवाळा गाठत पद्मावती सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये भाड्याने वास्तव्य सुरू केले होते. येथे ती स्वतःला सामान्य गृहिणी असल्याचे भासवत होती.
गुप्त माहिती आणि Mumbai drug bust तांत्रिक तपासाच्या आधारे घाटकोपर अंमली पदार्थ विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून तिच्या घरावर छापा टाकला. मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांना ४,०५६ एमडी गोळ्या सापडल्या, ज्यांचे वजन सुमारे २ किलो ३०० ग्रॅम इतके आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या साठ्याची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणामुळे हे केवळ स्थानिक नव्हे तर मोठे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासात ही महिला केवळ पुरवठादार नसून मुंबईतील मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचे संचालन करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.तपास यंत्रणांनी या महिलेचे नाव सध्या गोपनीय ठेवले असून, तिच्या संपर्कातील इतर साथीदार, ड्रग्जचा स्रोत आणि वितरण साखळी यांचा सखोल तपास सुरू आहे. या कारवाईनंतर या नेटवर्कमधील इतर मोठे सदस्य लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.