सीबीएसई दहावी दुसऱ्या परीक्षेसाठी नोंदणीला वेग

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
नागपूर,
CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२६ मधील इयत्ता दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेसाठी उमेदवारांची यादी (एलओसी) सादर करण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून विद्यार्थ्यांसाठी आता मर्यादित वेळ शिल्लक आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी निश्चित करण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
 

10 second exam  
ही संपूर्ण प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडत आहे. पहिला व दुसरा टप्पा दिनांक १६ ते २० एप्रिल दरम्यान असून या कालावधीत उमेदवारांची नोंदणी आणि शुल्क भरणे शक्य आहे. तिसरा टप्पा दिनांक २१ व २२ एप्रिल रोजी विलंब शुल्कासह पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात समावेश न झालेल्या विद्यार्थ्यांनाही आता अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
या दुसऱ्या परीक्षेत गणित विषयाचा स्तर बदलण्याची विशेष सुविधा देण्यात आली आहे. स्टँडर्ड आणि बेसिक या पर्यायांमध्ये विद्यार्थ्यांना बदल करता येणार आहे. मात्र इतर विषयांमध्ये बदलास परवानगी दिली जाणार नाही. उत्तीर्ण विद्यार्थी विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा यांपैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये गुण सुधारण्यासाठी परीक्षा देऊ शकतील.कंपार्टमेंट प्रवर्गातील विद्यार्थी नियमानुसार पात्र असतील, तर ‘आवश्यक पुनरावृत्ती’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार नाही. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे सुविधा कायम राहतील.सीबीएसईने स्पष्ट केले आहे की, एलओसी सादर केल्यानंतर कोणतीही दुरुस्ती स्वीकारली जाणार नाही. तसेच नाव नोंदवूनही परीक्षेला अनुपस्थित राहिल्यास मुख्य परीक्षेतील गुणच अंतिम मानले जाणार आहेत.