कोरची,
Dharti Aaba scheme scam कोरची तालुक्यातील पांढरापाणी येथे शेतकरी शंकर मन्हेर मडावी यांना धरती आबा भगवान बिरसा मुंडा योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली होती. मात्र प्रत्यक्षात विहिरीचे बांधकाम न करताच त्यांच्या खात्यात लाखो रुपयांची रक्कम वळती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी स्वतः लाभार्थी शंकर मडावी यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेत संबंधित अधिकार्यांवर संताप व्यक्त केला. गरीब आदिवासी बांधवांच्या हक्कांवर डाका टाकणार्यांना सोडले जाणार नाही, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विहीर मंजूर होऊनही प्रत्यक्ष बांधकाम झाले नाही. दरम्यान, लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र केवायसी अपूर्ण असल्याने ही रक्कम काढता आली नाही आणि त्यामुळेच हा संपूर्ण प्रकार उघड झाला. प्रकरण उघडकीस आल्यानंतर घाईघाईने विहीर बांधकाम सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र दोषींवर कारवाई झाल्याशिवाय बांधकाम होऊ देणार नाही, असा निर्धार काही स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी व्यक्त केल्याने संबंधित अधिकार्यांची अडचण वाढल्याचे दिसून येते.
या घटनेला तीन Dharti Aaba scheme scam महिन्यांहून अधिक कालावधी लोटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशय अधिक गडद होत आहे. तातडीने दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार मसराम यांनी केली आहे.दरम्यान, अशाच प्रकारचा गैरव्यवहार कोरची तालुक्यातील बेलारगोंदी येथेही समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अर्धवट विहीर बांधकाम करून पूर्ण रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात वळती करण्यात आल्याचे समोर आले होते. या संदर्भात बातमी प्रसिद्ध होताच संबंधित विहिरीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात आले. चौकशी होऊनही कारवाई न झाल्याने संपूर्ण तालुक्यात चर्चेला उधाणआले असून चौकशी झाली, पण कारवाई कधी? हा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.लाभार्थ्याच्या घरी आमदारांनी भेट दिली, याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर तसेच विठ्ठल शेंडे उपस्थित होते.