परळी राष्ट्रवादीच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
बीड,
Fatal attack on Parli NCP leader बीड जिल्ह्यातील परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी संबंधित एका नेत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले नेते संजय जाधव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला.  मिळालेल्या माहितीनुसार, संजय जाधव हे आपल्या शेतातून घरी परतत असताना गोवर्धन परिसरात दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांना अडवले. अचानक झालेल्या या हल्ल्यात धारदार शस्त्राने त्यांच्या अंगावर वार करण्यात आले. डोके आणि शरीरावर अनेक वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आणि रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
halla
 
या घटनेनंतर परळी आणि आसपासच्या भागात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भररस्त्यात अशा प्रकारे राजकीय नेत्यावर हल्ला होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका वादाच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे पाहिले जात आहे. त्या घटनेचा एक दृश्यफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यामुळे हा हल्ला त्या वादाशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.