भास्कर राऊत
मारेगाव,
woman-death : तालुक्यातील नरसाळा येथील पेसा क्षेत्रांतर्गत जुन्या व कालबाह्य दगड खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून पाणी असलेल्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत महिला बेबी तुळशीराम राजगडकर (वय 55) असून त्या सकाळी 8.30 च्या सुमारास घरातील कपडे धुण्यासाठी गावाजवळील बंद पडलेल्या दगड खाणीवर गेल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून खाणीत पावसाचे पाणी साचलेले होते. कपडे धूत असताना अचानक पाय घसरल्याने त्या खोल पाण्यात पडल्या. खाण खोल असल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, बराच वेळ झाला तरी त्या घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. खाणीच्या काठावर त्यांचे कपडे व इतर साहित्य आढळून आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला.
प्रशासनाचा निष्काळजीपणा ?
नरसाळा येथील बंद पडलेल्या दगड खाणी उत्खननानंतर तशाच उघड्या ठेवण्यात आल्याचे समोर येत आहे. अनेक ठिकाणी कोणतेही संरक्षक कुंपण किंवा इशारा फलक नसल्याने अशा अपघाती घटना वारंवार घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. परिणामी, ग्रामस्थांनी खाणधारकांवर कारवाईची मागणी केली आहे.
नरसाळा येथील कालबाह्य दगड खाणी तातडीने बुजविण्याबाबत आम्ही यापूर्वीच जिल्हाधिकाèयांना ई-मेलद्वारे कळविले होते. मात्र त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. संबंधित खाणी न बुजविणे तसेच संरक्षक कुंपणाची व्यवस्था न करणे, यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. या घटनेला प्रशासनच जबाबदार आहे.
- विवेक तोडासे
माहिती अधिकार कार्यकर्ता तथा
आदिवासी टायगर सेना, मारेगाव तालुका अध्यक्ष