राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासाठी झाड कटाई...

खात्री करा अन गरज असेल तरच झाडे तोडा!

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
भंडारा
tree cutting राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील चौपदरीकरणाच्या कामा दरम्यान सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अपरिहार्य गरज सिद्ध केल्या शिवाय व सखोल तांत्रिक पडताळणी शिवाय एकही झाड तोडले जाणार नाही,” असे निर्देश त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प व्यवस्थापनाला दिले. पर्यावरणप्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत घेतलेल्या तातडीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. विशेष म्हणजे आपल्या केलेल्या झाडांच्या ठिकाणी जात जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
 

tree cutting 
फुलमोगरा ते कारधा या मार्गावर कडुलिंब, सागवान, चिंच, पिंपळ, करंजी, बाभूळ, आंबा, सिसम यांसारखी सुमारे १०० ते १५० वर्षे जुनी, डौलदार वृक्षसंपदा उभी होती. या झाडांनी केवळ पर्यावरणीय संतुलन राखले नाही, तर अनेक दशकांपासून प्रवाशांना सावलीही दिली. या पट्ट्यातील एकूण ११२ झाडांपैकी आतापर्यंत ४५ झाडांची तोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.वृक्षतोडीच्या विरोधात स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. “विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी थांबवावी,” अशी ठाम मागणी त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कंत्रातदार आणि वृक्षप्रेमी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी परिस्थितीचा सखोल आढावा घेतला.
 
 
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांमुळे पुढील वृक्षतोडीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.महामार्गाचे चौपदरीकरण हा विकासाचा भाग असला, तरी शतकानुशतके उभ्या असलेल्या वृक्षसंपदेचा नाश हा गंभीर मुद्दा ठरत आहे. ही झाडे केवळ सावली देणारी नसून, तापमान नियंत्रण, प्रदूषण नियंत्रण आणि जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. तज्ज्ञांच्या मते, रस्त्याच्या आराखड्यात सूक्ष्म बदल करून किंवा नियोजनपूर्वक उपाययोजना करून अनेक झाडे वाचवता आली असती.यावेळी डॉ.नितीन तूरस्कर, चंदू वंजारी, चंद्रशेखर भिवगडे, प्रमोद केसलकर, प्रवीण मेहर, मोहम्मद सईद शेख, प्रणय बडवाईक, वैभव चोपकर, सदानंद इलमे, हिवराज उके, नितीन कुथे, हेमंत साकुरे, निवेदन देतेवेळी उपस्थित होते.
 
 
जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी
वृक्षप्रेमी आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी राष्ट्रीय महामार्गातवर जाऊन सुरु असलेल्या कामादरम्यान कापण्यात आलेल्या झाडांची पाहणी केली. कापलेली झाडे खरंच, गरजेचे होते का? हे तपासून पुढील निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.