पुणे
Pune airport incident लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाला लँडिंगदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मोठा अपघात टळला. सुमारे रात्री १०:२५ वाजता घडलेल्या या घटनेत विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानाने जोरदार धक्का घेत ‘हार्ड लँडिंग’ केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून वैमानिक आणि हवाई दलाचे कर्मचारी सुरक्षित आहेत.
या घटनेनंतर तातडीने पुणे विमानतळाची एकमेव धावपट्टी बंद करण्यात आली. धावपट्टीवर आवश्यक तपासणी व सुरक्षितता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही तासांचा अवधी लागणार असल्याने रात्री उशिरापर्यंत विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धावपट्टी पुन्हा सुरू करण्यासाठी सुमारे चार ते पाच तासांचा कालावधी अपेक्षित होता.
पुणे विमानतळ हे दुहेरी-वापर मॉडेलवर कार्यरत असून येथे नागरी विमानसेवेबरोबरच हवाई दलाचा सक्रिय तळही आहे. या पार्श्वभूमीवर लढाऊ विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण रनवे तात्पुरता बंद करण्याची वेळ आली.घटनेनंतर इंधन मर्यादा आणि सुरक्षिततेचा विचार करून अनेक उड्डाणे इतर विमानतळांकडे वळवण्यात आली. गुजरातमधील सुरत आणि गोव्यातील मोपा विमानतळांवर काही विमानांचे डायव्हर्जन करण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. याशिवाय अनेक विमानांचे उड्डाण आणि आगमन रद्द करण्यात आले असून विमानतळावर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक Pune airport incident राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, हवाई दलाचे विमान सुरक्षितपणे थांबवण्यात आले असून कोणतेही नागरी नुकसान झालेले नाही. तसेच धावपट्टी लवकरात लवकर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्नशील आहेत.हवाई दलाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्येही घटनेची माहिती देत सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण आणि तांत्रिक बिघाडाची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे.या घटनेमुळे पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक काही काळासाठी पूर्णतः विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.