दुर्दैवी घटना : भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

    दिनांक :23-Apr-2026
Total Views |
नांदेड
road accident जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. हडसनी पाटी परिसरात भरधाव वेगातील कारने दोन दुचाकींना दिलेल्या जोरदार धडकेत हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Nanded road accident Hadgaon 
मिळालेल्या माहितीनुसार, एका वेगाने धावणाऱ्या स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना एकामागून एक जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की पहिल्या दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या तिघांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. मृतांमध्ये यशवंत नरवाडे, त्यांची आई रेखाबाई नरवाडे आणि आत्या अनुसयाबाई लोणारे यांचा समावेश असून ते निवघा बाजार येथील रहिवासी होते. या घटनेने एका कुटुंबावर काळाने घाला घातल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, कार चालकाचा वेगावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे निवघा बाजारसह हदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.