मुंबई,
Actress arrested in drug case मुंबईत उघडकीस आलेल्या अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीला अटक केली असून या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. जिया रेवळ प्रदीप जेकब (वय ३३) असे तिचे नाव असून ती चित्रपट क्षेत्रात सहाय्यक कलाकार म्हणून काम करत होती. पोलिसांच्या तपासात तिचा अमली पदार्थ पुरवठा साखळीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अटकेनंतर तिला बोरीवली येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

नेस्को परिसरातील अमली पदार्थ पार्टी प्रकरणाच्या तपासातून जिया ही एका मोठ्या तस्करी करणाऱ्या जाळ्याशी जोडलेली असल्याचे समोर आले आहे. या व्यवहारांसाठी लागणारी रक्कम तिच्या बँक खात्यातून फिरत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. स्वतःचा थेट सहभाग नसल्याचा तिचा दावा असला तरी तिने आर्थिक मदत केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात आतापर्यंत अकरा जणांना अटक करण्यात आली असून आनंद लक्ष्मण पटेल, विनीत सुनील गीरलानी, आयुष विकी साहू आणि शुभ रामलखन अग्रवाल यांच्याशी जियाचा संपर्क असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या बँक व्यवहारांची चौकशी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रक्कम जियाच्या खात्यात जमा झाल्याचे आढळून आले. मुख्य सूत्रधार मार्क उर्फ महेश खेमलानी यांच्या सांगण्यावरून हे व्यवहार करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. संबंधितांमधील आर्थिक व्यवहारांचे संदेश आणि संवादही पोलिसांना मिळाले आहेत.
दरम्यान, या कारवाईदरम्यान आयुषकडून पोलादपूर भागात लपवून ठेवलेल्या तब्बल ९३३ अमली पदार्थांच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. सुमारे पंधरा लाखांहून अधिक किंमतीच्या या गोळ्यांमध्ये विविध रंगांच्या गोळ्यांचा समावेश आहे. तपास पुढे जात असताना आणखी काही जणांनीही या जाळ्याशी संबंधित खात्यांमध्ये पैसे जमा केल्याचे समोर आले असून त्यांचीही चौकशी लवकरच होणार आहे. या प्रकरणातून अमली पदार्थांची एक संघटित साखळी कार्यरत असल्याचे संकेत मिळत असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.