गोंदिया,
Amgaon protest भर उन्हाळ्यात गावातील विंधनविहीरी नादुरुस्त असल्याने गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी गावकर्यांकडून पायपीट व वारंवार मागणी करूनही पंचायत समितीकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आमगाव तालुक्यातील पिपरटोला येथील ग्राम पंचायत सदस्य सुनील गिरडकर यांनी चक्क हातात बकेट व घागर घेऊन पंचायत समिती गाठली. यावेळी त्यांनी गटविकास अधिकार्याच्या दालणात जावून आंदोलन केले. मात्र, यावेळी गटविकास अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. असे असले तरी त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र या आंदोलनाची चर्चा होत आहे.
आमगाव तालुक्यातील पिपरटोला गावातील विंधनविहीर गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गैरसोय होत आहे. याविषयी गावकर्यांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे सदर विंधनविहीर दुरुस्ती करण्यासंदर्भात मागणी केली. मात्र, त्यावर काहीही कारवाई झाली नाही. दरम्यान, गावकर्यांच्या मदतीला धावत ग्रामपंचायत सदस्य सुनील गिरडकर यांनीही ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडे पाठपुरावा केला. मात्र, याकडे सस्पेशल दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गिरडकर यांनी स्वतः हातात खाली बकेट आणि घागर(गुंडी) घेऊन आमगाव येथील पंचायत समिती कार्यालयात येत गट विकास अधिकार्यांचे दालन गाठले. मात्र, त्यावेळी गट विकास अधिकारी उपस्थित नव्हते. मात्र, त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली. गावातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याची ही तळमळ पाहून सर्वत्र या आंदोलनाची चर्चा रंगली असून आता तरी प्रशासन जागेवर येईल का व गावातील बोरवेल लवकरात लवकर दुरुस्त करून मिळेल का? असा प्रश्न गावकर्यांकडून उपस्थित केला जात आहे.