भोयरटोल्यात भीषण पाणीटंचाई

- सौरऊर्जेवरील पाणीपुरवठा योजना दोन वर्षांपासून ठप्प

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
देवरी,
Bhoyartola water crisis तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंडकेपार अंतर्गत येणार्‍या ग्राम भोयरटोला येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून प्रशासनाच्या वतीने सौरऊर्जेवर आधारित लघु पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे दोन वर्षांपासून बंद पडली आहे. परिणामी गावकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 

Bhoyartola water crisis  
भोयरटोला येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळजोडणीचे काम करण्यात आले असले तरी अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याची वास्तूस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना पहाटेपासून विंधनविहीरींवर रांगा लावाव्या लागत आहेत. पाण्यासाठी दररोज महिलांमध्ये वादविवाद होत असल्याचेही समोर येत आहे, भोयरटोला गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असताना गावकर्‍यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली सौरऊर्जेवरील पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. ग्रामपंचायतीकडे या योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. सौरऊर्जेवरील पाणीपुरवठा योजनेसाठी कोणताही अतिरिक्त वीजखर्च लागत नाही. केवळ देखभाल व दुरुस्तीचा खर्च आवश्यक आहे, जो ग्रामपंचायतीसाठी सहज शक्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.परिणामी, सदर सौर उर्जेचे साहित्य धूळखात पडले आहेत. तेव्हा ग्रामपंचायत प्रशासनाने सौरऊर्जेवर चालणारी नळ योजना तात्काळ दुरुस्त करून गावात नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी भोयरटोलावासीयांनी केली आहे.