8.015 किलो गांजासह आंतरराज्यीय तस्करास अटक

2 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर,
Chandrapur drug bust चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थ विरोधी मोहिमेंतर्गत मोठी कामगिरी केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील कुंदन प्लाझा चौक परिसरात सापळा रचून एका आंतरराज्यीय तस्कराला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून 8.015 किलो अवैध गांजा जप्त केला आहे. शहादेव ठाकूरदास मलिक (53, रा. ठाकूरनगर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, सध्या रा. राष्ट्रवादी नगर, चंद्रपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 

Chandrapur drug bust 
 
एक व्यक्ती ओडिसा राज्यातून गांजाची मोठी खेप घेऊन चंद्रपूर शहरातील राष्ट्रवादी नगर भागात विक्रीसाठी येणार असल्यची माहिती 22 एप्रिल रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले आणि त्यांच्या पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने नागपूर मार्गावरील कुंदन प्लाझा चौक येथे नाकाबंदी करून सापळा रचला. दरम्यान रात्रीच्या सुमारास वर्णनाप्रमाणे एक संशयास्पद व्यक्ती प्लास्टिकची पिशवी घेऊन येताना दिसला. पोलिसांनी त्याला ताव्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या पिशवीत 8.015 किलो वजनाचा ओला गांजा (पाने, फुले व बियांसह) आढळून आल्या. पोलिसांनी आरोपी शहादेव मलिक यास अटक केली. आरोपीकडून 2 लाख रुपये किंमतीचा 8.015 किलो गांजा, एक जुना वापरता भ्रमणध्वनी असा एकूण अंदाजे 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीने हा गांजा ओडिसा राज्यातून तस्करी करून आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात अमली औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 मधील कलम 8 (क), 20 (ब) (2) (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलिस उप निरीक्षक विनोद भुरले व सुनील गौरकार, पोलिस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक इंग्रण, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार आदींनी केली.