मायक्रोसॉफ्टची स्वेच्छा निवृत्ती, मेटाची कपात!

हजारो कर्मचाऱ्यांचे भविष्य अधांतरी

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Microsoft's voluntary retirement जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात पुन्हा एकदा मोठ्या बदलांची चाहूल लागली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि मेटा प्लॅटफॉर्म्स या आघाडीच्या कंपन्या कर्मचारी संख्येत कपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात वाढत्या गुंतवणुकीमुळे इतर खर्च आटोक्यात ठेवण्याची गरज निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार, मेटा कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे दहा टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया पुढील काही दिवसांत सुरू होणार असून हजारो पदे रिक्त ठेवण्याचाही निर्णय कंपनीने घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे.
 
 
Microsoft
 
दुसरीकडे मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत कंपनीतील काही टक्के कर्मचारी निवृत्ती स्वीकारू शकतात, ज्यामुळे एकूण मनुष्यबळ कमी होणार आहे. या दोन्ही निर्णयांचा एकत्रित परिणाम पाहता, जवळपास वीस हजारांहून अधिक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, अशी चर्चा तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू झाली आहे. या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कर्मचारी कपातीचे वातावरण निर्माण झाले असून, तंत्रज्ञान कंपन्यांच्या भविष्यातील धोरणांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर देताना कंपन्या आपली रचना बदलत असल्याचे या निर्णयांवरून स्पष्ट होत आहे.