अर्जुनी मोरगाव,
Tidka forest fire, तालुक्यात कडक उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत तिडका गावालगत असलेल्या जंगल परिसरात अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग गावातील घरांच्या अगदी जवळ पोहोचल्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, गावकर्यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला असून अग्नशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिडका येथील वनविभागाच्या कम्पार्टमेंट क्रमांक ११५३ मध्ये दुपारच्या सुमारास आग लागली. उन्हाच्या कडाक्यामुळे आणि कोरड्या झाडाझुडपांमुळे आगीने क्षणार्धात विकराळ रूप धारण केले. आग गावाच्या दिशेने सरकत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, गावाचे पोलिस पाटील प्रशांत पुस्तोळे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अर्जुनी-मोरगाव नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. या बचावकार्यात अग्णीशामक दलाचे काळबांधे, Tidka forest fire, वनरक्षक बडोले, सरपंच बबीता उईके, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कुंडलीक कोसरे तसेच इतर ग्रामस्थांनी मोठी मदत केली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि संभाव्य मोठे नुकसान टळले. या घटनेमुळे उन्हाळ्यात जंगल परिसरात आग लागण्याच्या घटना वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.