अज्ञात टिप्परच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
तिरोडा, 
Tiroda road accident भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात टिप्परने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार पती किरकोळ जखमी झाले आहेत. ही दुर्घटना तिरोडा शहरालगतच्या सुकडी नाका परिसरात गुरुवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास घडली.
 

Tiroda road accident 
या अपघातात हंसलता चौधरी (वय ३५) आणि त्यांचा मुलगा तन्मय चौधरी (वय ९), दोघेही रा. कासा (काटी/बिरसोला) ता. गोंदिया यांचा जागीच मृत्यू झाला. तर धर्मदास चौधरी (वय ४०) हे किरकोळ जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, धर्मदास चौधरी हे नागपूर येथे रोजगारानिमित्त वास्तव्यास असून घटनेच्या वेळी ते आपल्या पत्नी व मुलासह दुचाकी (क्र. एमएच ३५ एव्ही ४१०२) वरून गोंदियावरून नागपूरकडे जात होते. सुकडी नाका परिसरात अज्ञात टिप्परने भरधाव वेगात त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की महिला व लहान मुलगा घटनास्थळीच ठार झाले.
अपघातानंतर टिप्पर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. फरार टिप्पर व चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून निष्पाप मायलेकाचा झालेला दुर्दैवी अंत सर्वत्र शोककळा पसरवणारा ठरला आहे.