थाळीतले फसवे पनीर 'बेनकाब होणार'

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
मुंबई
fake paneer राज्यात पनीरच्या नावाखाली ग्राहकांची होत असलेली फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आता त्यांच्या मेन्यू कार्ड, बिल तसेच इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर पदार्थांमध्ये ‘चीज अॅनालॉग’चा वापर असल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांची कठोर अंमलबजावणी १ मेपासून सुरू होणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
 

fake paneer crackdown Maharashtra, cheese analogue labeling rule India 
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पनीरऐवजी स्वस्त पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या ‘चीज अॅनालॉग’मुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांना नेमके काय दिले जात आहे याची पारदर्शक माहिती मिळावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.‘चीज अॅनालॉग’ हा दुग्धजन्य पदार्थ नसून तो वनस्पती तेल, स्टार्च, इमल्सिफायर्स यांसारख्या घटकांपासून तयार केला जातो. दिसायला तो पनीरसारखाच असल्याने अनेकदा ग्राहकांना फरक ओळखणे कठीण जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी पनीरच्या नावाखाली या पर्यायाचा वापर करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले होते.
या पार्श्वभूमीवर fake paneer राज्यभरात २७ एप्रिलपासून तपास मोहीम राबवण्यात येणार असून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना हॉटेल्स आणि विक्रेत्यांच्या खरेदी-विक्री बिलांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, ग्राहकांची फसवणूक झाल्याचे आढळल्यास संबंधित आस्थापनांचे परवाने रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत ही कारवाई करण्यात येणार असून ग्राहकांना योग्य माहिती देणे हे प्रत्येक अन्न व्यवसायिकाचे कर्तव्य असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय ग्राहक हिताचा असल्याचे मानले जात असून, यामुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या निर्णयामुळे हॉटेल उद्योगात काही प्रमाणात खळबळ उडाली असून, अनेक व्यावसायिकांनी नवीन नियमांचे पालन करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ग्राहकांना योग्य माहिती मिळावी आणि फसवणूक थांबावी, यासाठी प्रशासनाने पुढील काळात आणखी कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.