मुंबई,
Smita Jaykar special experience बॉलिवूडमधील मोठे कलाकार खऱ्या आयुष्यात अत्यंत साधे आणि जमिनीवर पाय ठेवून वागणारे असतात, असा अनुभव एका मराठमोळ्या अभिनेत्री स्मिता जयकर यांनी सांगितला. पडद्यावर दिसणारा ग्लॅमर आणि प्रत्यक्ष आयुष्यातील साधेपणा यात मोठा फरक असतो, हे तिने एका खास आठवणीच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने ठसा उमटवलेल्या अभिनेत्री स्मिता जयकर यांनी बॉलिवूडमधील काही नामांकित कलाकारांबद्दलचा आपला अनुभव शेअर केला आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून, मोठ्या कलाकारांसोबत काम करताना आलेल्या आठवणी त्यांनी सांगितल्या.

त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपूर्वी एका भेटीदरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी आणि अभिनेता रणबीर कपूर हे तिघे त्यांच्या घरी आले होते. त्या वेळी ते सर्वजण जेवणाच्या वेळी आले असल्याने घरगुती वातावरणात त्यांचे स्वागत झाले. या भेटीदरम्यान रणबीर कपूर अतिशय साधेपणाने वागत होते आणि इतरांसोबत जमिनीवर बसून जेवणाचा आनंद घेत होते, असेही त्यांनी सांगितले. त्या वेळी तो चित्रपटसृष्टीत फारसा प्रसिद्ध झाला नव्हता आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता, त्यामुळे त्याची ओळखही त्या वेळी लगेच पटली नव्हती. स्मिता जयकर यांनी सांगितले की, बाहेरून पाहताना कलाकारांभोवती असलेला प्रसिद्धीचा झगमगाट आणि चाहत्यांची गर्दी यामुळे त्यांच्याबद्दल वेगळी प्रतिमा तयार होते. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात ते अतिशय साधे, नम्र आणि सामान्य माणसांप्रमाणे वागणारे असतात. त्यांच्या या अनुभवामुळे कलाकारांविषयी असलेला गैरसमज दूर होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.