रात्री बिर्याणी आणि कलिंगड खाल्ले आणि सकाळी उठलेच नाही!

चौघांचा संशयास्पद मृत्यू

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Suspicious deaths of four in Mumbai मुंबईतील पायधुनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.एका कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या कुटुंबाने रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ल्यानंतर थोड्याच वेळाने कलिंगडाचे सेवन केले होते. त्यानंतर सर्वांना अचानक उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि काही तासांतच परिस्थिती गंभीर झाली. घाटी गल्लीतील मुघल इमारतीत राहणारे हे कुटुंब शनिवारी रात्री साडेदहा वाजता नातेवाईकांसह जेवण करून झोपले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची तब्येत झपाट्याने बिघडली. कुटुंबातील सदस्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला. काही तासांतच दुसऱ्या मुलीनेही प्राण गमावले, त्यानंतर पालकांचाही मृत्यू झाला.
 
 

deaths 
या घटनेत अब्दुल्ला डोकाडिया (वय ४०), नसरीन डोकाडिया (वय ३५) आणि त्यांच्या दोन मुली आयशा (१६) व झैनब (१३) यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबाने दिलेल्या प्राथमिक जबाबात त्यांनी बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याची माहिती दिली होती. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.