मुंबई
Tanvi Kolte बिग बॉस मराठी 6ची विजेती आणि अभिनेत्री तन्वी कोलते सध्या तिच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून, शो जिंकल्यानंतर तिच्या चाहत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच वाढत्या प्रसिद्धीसोबत तिच्या खासगी आयुष्याबाबत, विशेषतः लग्नासंदर्भातील चर्चांनाही उधाण आले होते. या सर्व चर्चांना आता तन्वीने स्वतःच पूर्णविराम दिला आहे.
‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात असतानाच तन्वीने वारंवार आपली भूमिका स्पष्ट केली होती की, ती कोणत्याही प्रकारच्या लव्ह अँगलमध्ये सहभागी होणार नाही. शो संपल्यानंतरही तिने आपल्या भूमिकेवर ठाम राहत लग्नाबाबत स्पष्ट मत मांडले आहे. “मला सर्वप्रथम माझ्या करिअरशी लग्न करायचं आहे,” असे ती म्हणाली. शोमध्ये अफेअर किंवा प्रेमप्रकरण निर्माण करण्याचा कोणताही विचार नव्हता, असेही तिने अधोरेखित केले.
प्रेमसंबंधांबद्दल बोलताना तन्वीने सांगितले की, “तीन महिन्यांत कोणावर प्रेम होऊ शकत नाही, आणि माझ्यासाठी तर ते शक्यच नाही.” त्यामुळे शोमध्ये प्रवेश करतानाच आपण एकटीच आत जाणार आणि एकटीच बाहेर पडणार, तसेच उत्तम खेळ करणार, असा निर्धार केल्याचे तिने सांगितले.
लग्नाबाबत अधिक खुलासा Tanvi Kolte करताना तन्वी म्हणाली की, तिचा दृष्टिकोन पारंपरिक आहे. “माझी आई माझ्यासाठी योग्य मुलगा पाहणार आहे आणि तिच्या पसंतीनुसारच मी लग्न करेन,” असे स्पष्ट करत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणतेही गुपित नसल्याचेही सांगितले.दरम्यान, ‘बिग बॉस’नंतर तन्वी कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असून, तिच्या पोस्ट्सना चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तिच्या आगामी वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.