मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉक करणारे तिघे ठार

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
मुंबई,
walker killed on Marine Drive मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघाताने शहर हादरले आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांमध्ये एक वृद्ध व्यक्ती, एक तरुण आणि एक तरुणी यांचा समावेश आहे. घटनेनुसार, गिरगाव परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक रोजच्या सवयीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी मरीन ड्राईव्ह येथे आले होते. साधारण साडेपाचच्या सुमारास ते रस्त्यालगत चालत असताना वेगात आलेल्या दोन दुचाकींनी त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुण आणि तरुणीही रस्त्यावर कोसळले आणि तिघांनाही गंभीर दुखापत झाली.
 

Marine Drive mumbai 
 
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून अपघात नेमका कसा घडला याचा शोध घेतला जात आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, दोन्ही दुचाकी अतिवेगात होत्या. त्या एकमेकांच्या जवळून जात असताना नियंत्रण सुटल्याने त्यांनी समोर चालत असलेल्या वृद्ध व्यक्तीला धडक दिली. या दुचाकींमध्ये शर्यत सुरू होती का, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, अपघात इतका भीषण होता की दुचाकींचे काही भाग तुटून रस्त्यावर विखुरले होते. या घटनेमुळे मरीन ड्राईव्ह परिसरात पहाटेच शोककळा पसरली आहे. याच दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरही एक वेगळा अपघात घडला. कोकण दर्शन करून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला घाटात ब्रेक निकामी झाल्यामुळे दुसऱ्या वाहनाने धडक दिली. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे सुदैव मानले जात आहे. दोन्ही वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.