यवतमाळ,
Laxmanrao Inamdar Memorial Essay Competition आंंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून यवतमाळ अर्बन बँकेतर्फे रविवार, 26 एप्रिल रोजी येथील हॉटेल व्हॅनेशियन येथे विदर्भस्तरीय भव्य सहकार परिषद आणि लक्ष्मणराव इनामदार स्मृती निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदेमातरम’ने करण्यात आली. यवतमाळ अर्बन बँकेने प्रथमच भव्य विदर्भस्तर सहकार परिषदेचे आयोजन केले होते. गेल्या आर्थिक वर्षात यवतमाळ अर्बन बँकेने नेट एनपीए शून्य टक्के करून नेत्रदीपक प्रगती केली असून बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांनी प्रास्ताविकातून केले.
या प्रसंगी सहकार भारतीचे प्रेरणास्रोत लक्ष्मणराव इनामदार यांच्या जीवनावर आधारित डॉ. नितीन खर्चे यांनी संकलन केलेले पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यवतमाळचे उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी शुभेच्छा देताना यवतमाळ अर्बन बँकेने सहकार परिषद घेवून एक चांगला उपक्रम केला आहे. बँकेने यावर्षी वसुली चांगली केली असून त्यामुळे बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के राहिला त्याबद्दल त्यांनी बँकेचे अभिनंदन केले.
भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी सहकार परिषदेचे उद्घाटन करताना आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात भारताने केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला. 2014 मध्ये भारताची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल अशी होती. परंतु गेल्या 10 वर्षांत परिवर्तन झाले असून आज भारताचा जीडीपी ग्रोथ जवळपास 7 टक्क्यांच्या आसपास आहे. आज देशाच्या ग्रामीण भागातसुद्धा डिजिटल ट्रॅन्झेक्शन होत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. यवतमाळ अर्बन बँकेने 3000 कोटींचा व्यवसाय पूर्ण केला असून बँकेची प्रगती वाखाणण्याजोगी असल्याचे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी म्हणाले महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सहकार परिषदेला शुभेच्छा दिल्या.
Laxmanrao Inamdar Memorial Essay Competition सहकार वर्ष 2025 निमित्त बँकेने घेतलेल्या लक्ष्मणराव इनामदार स्मृती राज्यस्तर निबंध स्पर्धेचा निकाल यावेळी घोषित करण्यात आला. एकूण 4 गटांत झालेल्या या स्पर्धेसाठी तीन हजार निबंध संपूर्ण राज्यातून आले होते. सर्व विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. बँकेचे उपाध्यक्ष अजिंदरसिह चावला यांनी स्पर्धेबद्दल माहिती दिली. समारोपप्रसंगी सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर म्हणाले, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सहकारी संस्था सुरू झाली पाहिजे. उदा. सहकारी तत्त्वावर टॅक्सी व्यवसाय सुरू झाला पाहिजे. सगळ्यात शेवटच्या माणसाच्या जीवनात उन्नती व्हायची असेल तर ती सहकाराचे माध्यमातूनच होऊ शकते. बँकेचे सहसरव्यवस्थापक गजानन वैद्य यांनी यावेळी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर कोहरे, महाराष्ट्र सहकार भारतीचे सरचिटणीस विवेक जुगादे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे संचालक डॉ. महेश सारोळकर आणि सतीश इसाळकर यांनी केले.