भोसलेकालीन विहिरीची दुर्दशा

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Bhosale-era well डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरालगत सोनेगाव–अमराईपारा मार्गाजवळ असलेली सुमारे ३०० वर्ष जुनी भोसलेकालीन ऐतिहासिक विहीर सध्या दुर्लक्षामुळे जर्जर अवस्थेत पोहोचली आहे. भोसले शासनकाळात बांधण्यात आलेली ही विहीर एकेकाळी परिसरातील महत्त्वाची जलवाहिनी होती. मात्र आज कचरा, प्लास्टिक आणि शेवाळ्यामुळे ती आपले ऐतिहासिक अस्तित्व गमावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या विहिरीच्या परिसरात प्राचीन मंदिर, हिरवाईने नटलेला परिसर आणि जंगल असल्याने तिचे ऐतिहासिक व पर्यावरणीय महत्त्व अधिक अधोरेखित होते. वस्तीपासून काही अंतरावर असूनही येथे दररोज अनेक नागरिक भेट देतात. विशेषतः तरुणांकडून पिकनिक, वाढदिवस व लहान कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र त्यानंतर परिसरात व विहिरीत टाकला जाणारा कचरा तिच्या दुर्दशेला कारणीभूत ठरत आहे.

well
विहिरीची रचना देखील धोकादायक होत चालली असून भिंतींचे काही भाग कोसळले आहेत. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विहिरीत उतरायला दगडी पायऱ्या असून त्या पारंपरिक वास्तुकलेचे उदाहरण आहेत. दगडी बांधकामावरून तिची प्राचीनता स्पष्ट जाणवते. दररोज फिरायला येणारे नागरिक या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत असून विहिरीच्या संवर्धनाची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात जल अभ्यासक व जल योद्धा पुरस्कार प्राप्त डॉ. प्रवीण डबली यांनी जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि संबंधित विभागांकडे विहिरीच्या पुनर्जीवन व संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. Bhosale-era well त्यांनी सांगितले की, विहीर पुनर्जीवित केल्यास तिचे पाणी परिसरातील झाडे व जंगल संवर्धनासाठी तसेच विमानतळ परिसरातील बागांच्या सिंचनासाठी उपयोगात आणता येईल. आपत्कालीन परिस्थितीतही ती पर्यायी जलस्रोत ठरू शकते.
यासोबतच नागपूर जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक विहिरींचे वैज्ञानिक मॅपिंग व सर्वेक्षण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अनेक प्राचीन विहिरी Bhosale-era well अद्याप पुरातत्त्व विभागाच्या यादीत नसल्यामुळे त्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी नमूद केले. वेळेत संवर्धन न केल्यास अशा ऐतिहासिक जलस्रोतांचे अस्तित्व धोक्यात येईल आणि पारंपरिक जलव्यवस्थेचा वारसा नष्ट होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सौजन्य: प्रवीण डबली, संपर्क मित्र