मालेगाव महापालिकेत बीएलओ निवडीवर जोरदार राडा

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
मालेगाव,
Clashes in Malegaon Municipal Corporation मालेगाव महापालिकेच्या विशेष महासभेत एमआयएम व इस्लाम पक्षाच्या नगरसेवकांमध्ये बीएलओच्या निवडीवरून जोरदार वाद उडाला. हमरी-तुमरी करत दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. धक्काबुक्की झाली आणि सभागृहात गोंधळ उडाला. त्यामुळे महासभेचे कामकाज काही काळ ठप्प झाले. महापौर नसरीन शेख यांनी नगरसेवकांना गंभीर इशारा दिला असून, अशा प्रकारची घटना पुन्हा घडल्यास संबंधित नगरसेवकांना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. नगरपालिकेत सध्या मतदार यादी पडताळणी व पुनरीक्षण (एसआयआर) सुरु असून, बीएलओची कामे अनेक शिक्षकांवर सोपवण्यात आली आहेत. अतिरिक्त कामामुळे शिक्षकांवर ताण निर्माण होत असल्याने, सुशिक्षित बेरोजगारांची सहायक बीएलओ म्हणून नियुक्ती करण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला.
 
 

Municipal Corporation 
 
वादाचा उद्रेक एमआयएमचे डॉ. खालीद परवेज यांनी ठरावावर आक्षेप घेत महापौर आणि उपमहापौर यांच्यासमोरच केला. इस्लाम पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये धक्काबुक्की व बाचाबाची झाली. महापौरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, डॉ. खालीद जाणीवपूर्वक असे करत आहेत आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी सभागृहात चार सुरक्षारक्षक तैनात केले जातील. ठराव आता जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असून, मंजूर होईल की फेटाळला जाईल हे पाहावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी देखील नगरसेवकांमध्ये अंदाजपत्रक मंजुरीसंदर्भात असा राडा झाला होता. त्या वेळी समाजवादी पक्षाचे नगरसेवक आणि एमआयएम व इस्लाम पक्षाचे नगरसेवक मालमत्ता कर व उत्पन्नाच्या स्रोतांवर चर्चा करत एकमेकांवर भिडले होते. त्या वादामुळे काही काळ महासभेचे कामकाज थांबावे लागले होते.