माणुसकीचा पाझर! झोळी भरली..."त्या" जखमींसाठी गोळा झाले 3.50 लाख!
दिनांक :30-Apr-2026
Total Views |
भंडारा,
humanity मी आणि माझा कुटुंब एवढीच मानसिकता आज अनुभवास येत असताना, सगळ्यासाठी एक एका क्षणाची झगडत असलेल्या दोन तरुणींच्या मदतीसाठी समाजाने दाखविलेले दातृत्व बरेच काही सांगून गेले. गावात झोळी फिरली, लोकांना आवाहन केले गेले माणुसकीचा पाझर होत काही तासातच चक्क साडेतीन लाखाची रक्कम मदत म्हणून गोळा झाली. अड्याळच्या ग्रामस्थांनी दाखविलेला हा मनाचा मोठेपणा दोघींसाठी जगण्याचा आधार ठरला तर समाजासाठी एक आदर्श.
काही दिवसांपूर्वी लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात झाला. पवनी तालुक्यातील अड्याळ येथील या वऱ्हाडातील पाच जणांचा मृत्यू झाला. हे दुःख त्या ग्रामस्थांवर कोसळले होते. सोबतच गावातीलच दोन तरुणी या अपघातात गंभीर जखमी झाल्याने प्रत्येक क्षण मृत्यूशी झगडत होत्या. अपघात ग्रस्त रक्षा खेडकर आणि नेहा नान्हे या दोघींच्याही घरची परिस्थिती अगदीच बेताची आहे. हातावर कमवून खाणे, या व्याख्येत मोडणाऱ्या या कुटुंबाला मुलींच्या उपचाराचा प्रचंड असा खर्च झेपण्यासारखा नव्हता. पण मुलींच्या जीवाची काळजी ही तेवढीच होती. अशातच ग्रामवासियांनी हे दुःख केवळ त्या दोन कुटुंबापुरते मर्यादित असल्याच्या संकुचित मानसिकतेत न राहता कुटुंबीयांच्या मदतीला जाऊन जाण्याचा निर्णय घेतला. एकीकडे महागाई आणि धावपळीच्या जगात माणूस आत्मकेंद्रित होत असल्याची ओरड होत असताना, ग्रामीण भागातील माणुसकीने मात्र सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. मुलींच्या मदतीसाठी संपूर्ण गाव एकवटलं आणि लोकवर्गणीतून अवघ्या काही तासात साडेतीन लाख रुपयांचा निधी उभा करून एका मोठ्या संकटात या कुटुंबांना आधार दिला. व्हॉट्सॲपवर मदतीचं आवाहन करण्यात आले. गावातील काही तरुणांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि मदतीचा ओघ सुरू झाला.humanity कोणी आपली मजुरी दिली, तर कोणी साठवलेले पैसे मुलींच्या उपचारासाठी सुपूर्द केले. झोळीही गावात फिरली. या झोळी जीवन मृत्यू मधील फरक कळलेल्या अनेक हातांनी दान टाकले. ज्याला जे शक्य झाले ती मदत करून, त्या दोघींच्याही सुखरूप परतण्याची याचना केली. साडेतीन लाखाचा निधी आता या मुलींच्या उपचारासाठी मोठा आधार ठरणार आहे. या कल्याणाच्या कार्यात पोलिस विभागानेही स्वतःचा वाटा उचलला.
ग्रामस्थांची ही माणुसकीचा विजय झाल्याची सिद्ध करणारी होती. आजच्या स्वार्थी जगात या गावकऱ्यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता समाजासमोर एक नवा आदर्श ठेवणारी ठरली आहे. 'माणूस माणसाच्या कामी येतो' हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.