गुन्हेगाराशी संपर्क ठेवल्याने पोलीस शिपायावर कडक कारवाई

    दिनांक :04-Apr-2026
Total Views |
पुणे
Pune police पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस शिपायाला अवैध धंदे चालवणाऱ्या गुन्हेगाराशी जवळीक ठेवल्याप्रकरणी महागात पडले आहे. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी संबंधित कर्मचाऱ्याची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कडक शिक्षा सुनावल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
 

Pune police misconduct, constable penalized, salary increment frozen, 
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस कर्मचारी वैद्यकीय रजेवर असताना देखील सोमवार पेठ येथील गुन्हेगार प्रवीण राजेंद्र चव्हाण याच्याशी सतत संपर्कात होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२५ या दोन महिन्यांत त्याने चव्हाणशी तब्बल आठ वेळा संपर्क साधल्याचे तांत्रिक तपासात स्पष्ट झाले आहे. प्रवीण चव्हाण याच्यावर जुगार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दंगल आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्हेगाराशी पोलिसाचा संपर्क ठेवणे हे शिस्तभंग मानून ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रारंभिक तपासानंतर Pune police सुरुवातीला दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, मात्र कर्मचाऱ्याची बाजू विचारात घेऊन प्रशासनाने शिक्षेचे स्वरूप कमी करून एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचा अंतिम आदेश दिला. याच प्रकरणात गुन्हे शाखेतील दोन अन्य कर्मचाऱ्यांवर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, हे देखील त्याच गुन्हेगाराच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले होते.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून ‘क्लीन पोलीस फोर्स’ या मोहिमेवर भर दिला असून, गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या किंवा त्यांच्या आर्थिक हितसंबंध जपणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही माफीनामा दिला जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून स्पष्टपणे देण्यात आला आहे.