ध्यानचंद चषक स्पर्धेची दमदार सुरुवात
यवतमाळ,
महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना व यवतमाळ जिल्हा पोलिस बॉईज संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Dhyanchand Cup 2026 ध्यानचंद चषक २०२६ या राज्यस्तर आमंत्रित हॉकी स्पर्धेचे उद्घाटन अभ्यंकर कन्या शाळा क्रीडांगण येथे उत्साहपूर्ण दिमाखदार वातावरणात झाले. स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आकाश चिकटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी पोलिस उपनिरीक्षक व आंतरराष्ट्रीय खेळाडू साहेबराव राठोड, विदर्भ हॉकी असोसिएशनचे समन्वयक कृष्णा जोशी, शिवसेनेचे समन्वयक सौरभ तिवारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. उल्हास नांदुरकर, प्रा. घनश्याम दरणे, क्रीडा पत्रकार प्रा. निलेश भगत, बीजेपी क्रीडा जिल्हाध्यक्ष बंटी गुप्ता, अभ्यंकर कन्या शाळा पर्यवेक्षक प्रगती पराते उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत हॉकी खेळाच्या विकासासाठी अशा प्रकारच्या राज्यस्तर स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ग्रामीण व शहरी भागातील नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासंबंधाने या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
Dhyanchand Cup 2026 स्पर्धेत राज्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला असून, खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. यवतमाळकर क्रीडाप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उद्घाटन सोहळा अधिक रंगतदार व यशस्वी ठरला. ही स्पर्धा ३, ४ व ५ एप्रिल दरम्यान पार पडल्या. हॉकी खेळाचा शहरी व ग्रामीण भागात प्रचार व प्रसार करणे तसेच क्रीडा संस्कृतीला चालना तळागाळातून हॉकीचे खेळाडू तयार व्हावेत हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. क्रीडाशिक्षक संजय बट्टावार, गुड्डू मीर, अभिजित पवार, किशोर बाभुळकर, शैलेश नगराळे, प्रशांत बोराडे, मोहन ढोके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश जोशी यांनी केले.