अंजनगाव सुर्जी,
anjangaon-taluka-tops-the-board : अंजनगाव सुर्जी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नेमके काय सुरू आहे, हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. दहावीच्या कॉपी प्रकरणात अमरावती मंडळातील धक्कादायक आकडे समोर आल्यानंतर, कॉपीचा कारखाना अंजनगावातच का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
२ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत अमरावती जिल्ह्यातील ५४ विद्यार्थ्यांना कॉपी प्रकरणी बोलावण्यात आले होते. मात्र, यातील तब्बल ४९ विद्यार्थी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली. एकाच तालुक्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कॉपी करताना पकडले जाणे ही बाब केवळ योगायोग मानणे कठीण असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. या घटनेमुळे अंजनगावच्या शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, शहरात अनेक नामांकित आणि मोठ्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत. निकालांच्या जाहिरातींमध्ये अव्वल स्थानाचा दावा करणार्या या संस्थांतीलच विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याने, त्यांच्या कार्यपद्धतीवर संशयाची सुई अधिक तीव्र झाली आहे.
यापूर्वी अंजनगावमध्ये उघडकीस आलेल्या पेपरफुटी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली होती. त्या प्रकरणातील काही प्रमुख आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पेपरफुटीपासून कॉपीपर्यंत गैरप्रकारांची साखळी तयार झाली आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. परीक्षा केंद्रांवरील नियंत्रण, पर्यवेक्षकांची जबाबदारी आणि तपासणी यंत्रणा यामध्ये मोठ्या त्रुटी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या पृष्ठभूमीवर केवळ विद्यार्थ्यांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नसून संबंधित शाळा, परीक्षा केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकार्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
अंजनगाव सुर्जीचे नाव वारंवार अशा गैरप्रकारांमुळे चर्चेत येत असल्याने, तालुक्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसत आहे. शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्हता टिकवण्यासाठी आता कठोर आणि निष्पक्ष कारवाई होणे गरजेचे आहे.
आपल्या शाळेचा निकाल चांगला लागावा यासाठी काही शिक्षणसंस्था कॉपी करण्याचा प्रकार करीत असल्याने हा गैरप्रकार अंजनगाव तालुक्यात होत असल्याने अशा गैरप्रकार करणार्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी सर्वच स्तरातून पुढे येत आहे.