धारणी,
khandwa-akot-train-service : मागील दहा वर्षांपासूनची दीर्घ प्रतीक्षा आता संपलेली आहे. म्हणजे खंडवा-अकोट मीटर गेज रेल्वे लाईन बंद झाल्यापासून ब्रॉड लाईनचे काम सुरू होते. आमला खुर्द जवळ तापी नदीवर रेल्वे पूल तयार होऊन पूर्ण झालेला आहे. मार्च अखेरीस तापी नदीवरील नवीन रेल्वे पुलावर ११० तासी गतीने रेल्वेचे इंजिन धावले. चाचणी यशस्वी झाल्याने मेळघाटात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. मेळघाटच्या सावलीखेडा जवळ (खिडकी कलम) मध्यप्रदेशच्या खिडकी गावात स्टेशन असल्याने ब्रॉडगेजचा लाभ धारणी तालुक्याला प्राप्त होईल. प्राप्त माहितीप्रमाणे, खंडवा ते खकनारपर्यंत ११० कि. मी.ची ब्रॉड गेज लाईन पूर्ण झाल्यावर आमुल्ला खुर्दजवळ तापी नदीवर रेल्वेचे लोखंडी पुलाचे काम पूर्ण होताच मार्च अखेर रेल्वे इंजिनची ट्रायल यशस्वी झाल्याने संचारविषयक आकांक्षा वाढलेल्या आहेत. दक्षिण भारताच्या सरळ मध्य व उत्तर भारतापर्यंत संपर्क करणे सोयीचे होईल म्हणून अकोला, अकोट, नांदेड आणि मेळघाटात यशस्वी ट्रायलमुळे आनंद पसरलेला आहे. अडगाव (महाराष्ट्र) ते खकनार (म. प्र.) पर्यंतचे रुळाचे काम यावर्षी पूर्ण करीत महू-अकोला ब्रॉडगेज रेल्वेलाईन सुरू करण्याचे दक्षिण मध्य पूर्व रेल्वेचे प्रयत्न आहेत.

विशेष असे की, मेळघाटातील डाबका, धुळघाट रेल्वे हे दोन स्टेशन बंद करून ब्रॉडगेज रेल्वे बुलडाणा जिल्ह्यातून म. प्र. च्या खकनार मार्गे वळती करण्यात आलेली होती. मेळघाटात रेल्वे बंद झाल्याने धारणी तालुक्यातून विरोधाचे स्वर सुद्धा उठलेले होते. परिणामी धारणी तालुक्याच्या अगदी सीमेवरील खिडकी गावात स्टेशन देऊन शासनाने मेळघाटवासीयांना दिलासा दिला आहे. तापी नदीच्या पुलावरून झालेल्या या चाचणीमुळे आनंद व्यक्त होत आहे. वन्य प्राणी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला वगळून ब्रॉडगेज सुरू करण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे.
इंग्रजकालीन मीटर गेज बंद झाल्याने वर्हाड ते निमाड संपर्क बंद झालेला होता. आता मात्र तो सुरू होण्याच्या बेतात पोहचला आहे. विशेष असे की, महाराष्ट्रातील मेळघाट व वर्हाडचे मध्य प्रदेशच्या निमाड परिसरासोबत अतुट असे सांस्कृतिक नाते आहे. ओंकारेश्वसाठी पण हा एकमेव मार्ग सरळ, स्वस्त व सोपा आहे.