एमडीचे दोन मुख्य तस्कर अटकेत

-आंतरराज्य टोळीचे होत सदस्य -अमरावती पोलिसांची कामगिरी

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
अमरावती, 
main-smugglers-of-md-arrested : एक महिन्यापूर्वी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून अमरावतीत एमडी घेऊन येणार्‍या दोघांना पकडले होते. तेव्हापासून पोलिसांनी एमडीचा कारखाना व मुख्य पुरवठादारांना शोधण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत पोलिसांना यश मिळाले असून राजस्थानात एमडी बणवणारा तसेच एमडी विक्रीमध्ये दलाली करणार्‍या अशा दोन मुख्य तस्करांना अमरावती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजस्थानात ताब्यात घेवून मंगळवारी अमरावतीत आणले.
 
 
amt
 
विष्णुलाल मोहनलाल गायरी (३२, रा. मोहेडा, अरनोड ह. मु. रिछा जि. प्रतापगड) आणि मांगीलाल गणपतसिंग सिंघावर (४६, रा. मिदीयान, ता. मकराना, राजस्थान) अशी या तस्करांची नावे आहेत. ८ मार्च रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने शहरालगतच्या लालखडी ते सुकळी मार्गावर अब्दुल फईम व शेख अयान या दोघांना ३ कोटी ३० लाखांच्या एमडीसह पकडले होते. ही एमडी त्यांनी मुंबईतील अजीम नामक दलालाच्या माध्यमातून खरेदी केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अजीमला पकडले. अजीम राजस्थानातून ही एमडी बोलवून देतो. यासाठी तो राजस्थानातील मांगी उर्फ मांगीलाल या दलालाच्या माध्यमातून व्यवहार करतो, असे तपासात पुढे आले. त्यामुळे मागील महिनाभरापासून गुन्हे शाखेचे पथक एमडीचे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान मागील पाच दिवसांपासून शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय संदीप चव्हाण, एपीआय महेश इंगोले व त्यांचे १६ पोलिस जवान राजस्थानात दबा धरुन बसले होते. यावेळी पोलिसांनी सुरुवातीला मांगीलालला ताब्यात घेतले. त्याच्या माध्यमातून सापळा रचला आणि विष्णूलाल गायरी यालाही पकडले.
 
 
विष्णुलाल आणि त्याचा बिझनेस पार्टनर राधेश्याम श्रीपाद दमामी या दोघांचे राजस्थानमध्ये एमडी निर्मितीचे दोन ते तीन कारखाने होते. मात्र काही दिवसांपूर्वीच राजस्थान पोलिसांनी त्यांचे कारखाने उध्वस्त केले आहेत. मात्र राजस्थान पोलिसांकडून विष्णुलाल गायरी पसार होता. मात्र शहर पोलिसांनी त्याला व मांगीलालला पकडल्यामुळे एमडीचे मोठे जाळेउघड करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. राध्येशाम दमामी हा पसार असून पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.