अमरावती,
accident : अमरावती - अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्रीनंतर चारचाकीच्या झालेल्या एका भीषण अपघातात बडनेरा जुनीवस्ती येथील ४ युवकांचा जागीच मृत्यू झाला असून ३ गंभीर जखमी झाले आहेत. बेलोरा विमानतळाजवळ ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

बडनेरा येथील ७ युवक मध्यरात्री चहा पिण्यासाठी बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये गेले होते. चहा घेऊन परतत असताना एका ट्रकची धडक त्यांच्या कारला बसली. त्यानंतर कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद अनस मोहम्मद सईद (वय २०), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (वय २२), मोहम्मद अवेझ मोहम्मद सईद (वय २६) व अब्दुल अनवेस अब्दुल सलीम (वय २२) सर्व रा. बडनेरा जुनीवस्ती अशी मृतकांची नावे आहेत. अपघातानंतर संबंधित ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. बडनेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत. ट्रकच्या धडकेनंतर कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या अपघातातील तीन गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर बडनेर्यात हळहळ व्यक्त होत आहे.