बोरच्या खोलीकरणासह संरक्षण भिंतीस गती : पालकमंत्री डॉ. भोयर

*शिवमंदिर सभागृहात जनसंवाद कार्यक्रम

    दिनांक :11-May-2026
Total Views |
सेलू,
dr bhoyar दरवर्षी पावसाळ्यात बोर नदीच्या पुरामुळे होणार्‍या त्रासातून सेलू शहराला कायमस्वरूपी दिलासा मिळावा, यासाठी आता प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बोर नदीवरील पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामापूर्वी नदीपात्राचे तब्बल ७ किमीपर्यंत तातडीने खोलीकरण करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रशासनाला दिले. कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष तथा माजी खा. रामदास तडस, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे, नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, उपनगराध्यक्ष रेखा खोडके, भाजपाचे जिल्हा महामंत्री अशोक कलोडे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अशोक मुडे, नपं गटनेते शैलेंद्र दफ्तरी, शहराध्यक्ष ओमदेव सावरकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल खोडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष गोलू कमीनकर, शिवा डुकरे, धीरज पवनारकर, नरेश पाठक आदी उपस्थित होते.
 
 

बोरच्या खोलीकरणासह संरक्षण भिंतीस गती
 
 
सेलू शहरात ५७० लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणार्‍या बोर नदी पूर संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. यानंतर आठवडी बाजार परिसरातील शिवमंदिर सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध समस्या मांडल्या. विशेष म्हणजे, नागरिकांच्या प्रश्नांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सेलू तालुक्याशी आपली विशेष आत्मीयता असल्याचे सांगत तालुयात मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा मांडला. तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, न्यायालयीन इमारत, ग्रामीण रुग्णालय, नवीन पोलिस ठाणे, पोलिस कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने तसेच जलतरण तलावासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यात पोलिस उपविभागीय कार्यालयासह सिंचन प्रकल्पांच्या खोलीकरणाचे प्रस्तावही मार्गी लावले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपंचायतीकडून कायम निधीअभावाची ओरड होत असल्याचा टोला लगावत त्यांनी शहरासाठी १ कोटी रुपयांचे नमो उद्यान मंजूर केल्याचे जाहीर केले.dr bhoyar या उद्यानाचे कामही वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सेलूकरांना पावसाळ्यात वारंवार भेडसावणार्‍या पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून पूर संरक्षण भिंतीचे काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी केले. संचालन मंडळ अधिकारी रमेश भोले व अशोक कलोडे यांनी केले.