मुंबई,
Drug Racket Busted in Mumbai मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १०० कोटी रुपयांच्या मूल्याचा मेफेड्रोन (एमडी) ड्रग तयार करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. या कारवाईत ड्रग तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल, रसायने आणि प्रयोगशाळेतील उपकरणे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहेत.पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सुमारे ४ लाख रुपये किंमतीचा कच्चा माल तसेच विविध रसायने हस्तगत करण्यात आली. या रसायनांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग तयार करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील ड्रग बाजाराला पुरवठा करण्यासाठी हा संपूर्ण कट रचण्यात आला होता.
यापूर्वी एप्रिल महिन्यात पोलिसांनी मेफेड्रोन तस्करी प्रकरणात काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास करण्यात आला आणि मोठ्या साठ्याचा शोध लागला.तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, या नेटवर्ककडून टप्प्याटप्प्याने एमडी ड्रग तयार करण्याची तयारी सुरू होती. मात्र पोलिसांना वेळेवर माहिती मिळाल्याने सापळा रचून मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर ड्रग निर्मितीचा प्रयत्न थांबवण्यात यश आले आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून, आरोपींच्या नेटवर्कद्वारे रसायनांचा पुरवठा कुठून होत होता याचाही शोध घेतला जात आहे. या कारवाईत एकूण १३ जणांना अटक करण्यात आली असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ६.७७ किलोहून अधिक एमडी ड्रग, २५५ किलो विविध रसायने तसेच प्रयोगशाळेत वापरली जाणारी साधने यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत कोटींच्या घरात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात फिरदोस अरबाज कुरेशी नावाच्या महिलेच्या अटकेनंतर संपूर्ण नेटवर्कचा उलगडा झाला. तिच्या आणि तिच्या पतीच्या चौकशीतूनच मोठ्या प्रमाणावर ड्रग निर्मितीचा कट समोर आला. पोलिसांनी आता या संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास सुरू केला आहे.