अनिल कांबळे
नागपूर,
Car Accident in Sitabuldi सीताबर्डी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात भरधाव कारने सायकलस्वाराला जाेरदार धडक दिली. या अपघातात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. श्यामलाल मेढाई वर्मा (70, उत्तर प्रदेश) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
माहितीनुसार, श्यामलाल वर्मा हे सध्या रामदासपेठ येथील काछीपुरा भागात भाड्याने राहत हाेते. ते शहरातील विविध बंगल्यांमध्ये जाऊन बागकाम (माळी काम) करायचे. शुक्रवारी पहाटे 5 च्या सुमारास श्यामलाल हे आपल्या सायकलने कामावर जाण्यासाठी निघाले हाेते. सीताबर्डीतील श्रीमद रामचंद्र चाैक, वेस्ट कार्ट बिल्डिंग समाेरील राेडने जात असताना, एका अज्ञात कार चालकाने वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून त्यांच्या सायकलला पाठीमागून जाेरदार धडक दिली.
Car Accident in Sitabuldi ही धडक इतकी भीषण हाेती की श्यामलाल वर्मा हे गंभीर जखमी झाले. त्यांचे चुलत भाऊ आणि पाेलिसांनी त्यांना मेडिकल रुग्णालयात नेले, मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. अपघातानंतर आराेपी कार चालक मदतीसाठी न थांबता आपले वाहन घेऊन पळून गेला. याप्रकरणी मृताचे चुलत भाऊ रामसुख भगेलूराम वर्मा (63, समतानगर, नारी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उड्डाणपुलावर विचित्र अपघात
शहिद गाेवारी उड्डाणपुलावर शुक्रवारी दुपारी दाेन वाजता विचित्र अपघात घडला. तीन कार एकमेकांवर धडकल्या. यामध्ये तीनही कारचे नुकसान झाले. तीनही कारचालकांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळपर्यंत उड्डाणपुलावरील वाहतूक बाधित झाली. मात्र, त्यांनी पाेलिसात तक्रार करण्याऐवजी त्यांनी आपसात नुकसान भरपाई देऊन प्रकरण मिटवले.