हिंगणघाट,
hinganghat accident news आई-बाबा हे शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर एक सुरक्षित प्रेमळ जग उभं राहतं. छोट्याश्या फुलपाखरासाठी ते सुरक्षेचा कोष असतो. आयुष्यात त्या छोट्याश्या पिलाला कशा कश्याचीही गरज नसते. आणि त्या माय-बापासाठी ती असते एक आनंदाचा झरा. काळाच्या समोर कोणाचेही काही चालत नाही. ११ मेच्या रात्री एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि एक उमलती कळी अनाथ झाली. तिच्या डोळ्यासमोर त्या काळरुपी ट्रकने तिच्या स्वप्नाचा चुराडा केला.
वरोरा येथून लग्नकार्य आटोपून हिंगणघाटला येत असलेल्या एका दुचाकीला कुटीर रुग्णालयाजवळ ट्रकने जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघातात पती-पत्नी ठार तर चार वर्षाची मुलगी पूर्वा जखमी झाली. तिच्या नजरेसमोर क्रूर काळाने तिचे आई-बाप ओढून नेले.
चार वर्षाच्या पूर्वाला तिच्या आई वडिलांच्या अन्त्यविधीसाठी रुग्णालयातून घरी आणले. त्यावेळी तिच्या चेहर्यावर भीती आणि घाबरल्याचे केवळ भाव होते. त्या दोघांच्या पार्थिवावर होणारे संस्कार ती मूकपणे बघत होती. आत्ता त्या चार वर्षाच्या कोवळ्या जीवनात कोण भरेल इंद्रधनुष्याचे सोनेरी रंग.hinganghat accident news वृद्ध आजी तरुण कमावत्या मुलाच्या व सुनेच्या अशा अकाली जाण्याने खचून गेलेली. इंदिरा गांधी वार्ड येथील रहिवाशी यादव सलाम (३५ ), पत्नी विद्या (२७) व मुलगी पूर्वा (४) हे स्कुटीवरून वरोरा येथील नातेवाईकांचे लग्न आटोपून हिंगणघाटला येत असताना उपजिल्हा रुग्णालयाजवळून शिवाजी मार्केट कडील मार्गाकडे वळण्याकरिता पुलावर चढत असताना नागपूरकडून हैदराबादकडे जाणार्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मुलगी दूर फेकल्या गेली.