नवी दिल्ली,
A Twist in the IPL Playoff Race आयपीएल 2026 स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून प्लेऑफमध्ये कोणते चार संघ स्थान मिळवणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला दमदार कामगिरी करणारे काही संघ आता अडचणीत सापडले आहेत, तर सुरुवातीला संघर्ष करणाऱ्या संघांनी जोरदार पुनरागमन करत प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला मजबूत केले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात गुणतालिकेतील समीकरणे दिवसागणिक बदलताना दिसत आहेत.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले असून उर्वरित जागांसाठी अनेक संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विशेषतः पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने हंगामाच्या सुरुवातीलाच जबरदस्त प्रदर्शन केले होते. पहिल्या सात सामन्यांपैकी सहा सामने जिंकत संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले होते. एका सामन्यात पावसामुळे निकाल लागला नव्हता, त्यामुळे त्यांना अतिरिक्त गुणही मिळाला होता. सुरुवातीच्या कामगिरीनंतर पंजाब हा विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. मात्र त्यानंतर संघाची घसरगुंडी सुरू झाली आणि सलग पराभवांमुळे त्यांची प्लेऑफमधील स्थिती धोक्यात आली आहे.
सध्या पंजाब गुणतालिकेत वरच्या स्थानावर असला तरी त्यांचा फक्त एक सामना शिल्लक आहे. दुसरीकडे, त्यांच्या खालील संघांकडे अजून दोन सामने असल्याने पंजाबसाठी परिस्थिती कठीण बनली आहे. आगामी सामन्यांचे निकाल त्यांच्या भवितव्यावर थेट परिणाम करणार आहेत.राजस्थान रॉयल्सची स्थितीही काहीशी अशीच झाली आहे. संघाने सुरुवातीचे सामने जिंकत स्पर्धेत मजबूत दावेदारी निर्माण केली होती. मात्र नंतर त्यांच्या कामगिरीत सातत्याने घसरण झाली. शेवटच्या काही सामन्यांमध्ये राजस्थानला अपेक्षित यश मिळाले नाही आणि त्यामुळे त्यांचे प्लेऑफचे गणित गुंतागुंतीचे बनले आहे. सध्या अनेक संघ समान गुणांवर असल्याने प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. एका पराभवामुळे समीकरण पूर्णपणे बदलू शकते, तर एका विजयामुळे संघ थेट अव्वल चारमध्ये पोहोचू शकतो. त्यामुळे आगामी सामने आयपीएलच्या या हंगामातील सर्वात रोमांचक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.