तेवीस वर्षांनी पुन्हा फुलला स्नेह, ऋणानुबंधाने ओलावलेला भावस्पर्शी मेळावा

मारेगावच्या आदर्श हायस्कूलचे माजी विद्यार्थी

    दिनांक :18-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
adarsh-high-school-maregaon : आयुष्याच्या विशाल प्रवासात काही माणसं काळाच्या वळणांवर हरवून जातात. काही चेहरे आठवणींच्या धूसर पडद्याआड लुप्त होतात, पण काही नाती अशी असतात, ज्यांना अंतर तोडू शकत नाही, काळ विसरू शकत नाही आणि परिस्थिती पुसू शकत नाही. ती नाती फक्त पुन्हा भेटण्याची वाट पाहत असतात, एखाद्या जुन्या घरट्यात परतणाèया पाखरांसारखी..!
 
 
y18May-Aadarsha
 
 
 
मारेगावच्या आदर्श हायस्कूल येथील इयत्ता दहावी 2002-03 च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा म्हणजे अशाच जिवाभावाच्या ऋणानुबंधांना पुन्हा नव्याने स्पर्श करणारा, डोळ्यांच्या कडा नकळत ओलावून टाकणारा आणि मनाच्या कप्प्यात दडलेल्या आठवणींना अलगद जागवणारा भावस्पर्शी क्षण ठरला.
 
 
तब्बल तेवीस वर्षांपूर्वी एकाच वर्गात बसणारी, एकाच घंटेसोबत धावत सुटणारी, एकाच मैदानावर स्वप्नं रंगवणारी आणि आयुष्याच्या कोèया पाटीवर भविष्याची अक्षरं कोरणारी ती पाखरे, आज पुन्हा एकदा आपल्या जुन्या घरट्यात एकत्र आली होती.
 
 
काळाने प्रत्येकाला वेगवेगळ्या दिशांना नेले. कोणी नोकरीत रमले, कोणी संसाराच्या जबाबदाèयांत गुरफटले, कोणी शहरांच्या गर्दीत स्वतःला हरवून बसले. पण मनाच्या एखाद्या शांत कोपèयात आपली शाळा आणि आपली माणसं मात्र आजही तितकीच जिवंत होती.
 
 
 
शाळेच्या आवारात पाऊल टाकताच प्रत्येकाचं मन नकळत भूतकाळाच्या पायवाटेवरून चालू लागले. तीच वर्गखोली, तेच बाक, तेच मैदान आणि त्या भिंतींवर अजूनही जणू बालपणाच्या हसèया सावल्या फिरताना जाणवत होत्या. क्षणभरासाठी वाटलं काळ थांबला आहे आणि आयुष्य पुन्हा एकदा शाळकरी दिवसांत परतले आहे.
 
 
अनेक वर्षांनंतर गुरुजनांना भेटताना डोळ्यांत नकळत पाणी दाटून आले. कधी गृहपाठ न केल्यावर मिळालेली शिक्षा, कधी चांगल्या गुणांवर पाठीवर पडलेली शाबासकीची थाप, कधी चुकीनंतर प्रेमाने दिलेला सल्ला त्या प्रत्येक क्षणामागे दडलेलं गुरुजनांचं प्रेम आज अधिक स्पष्टपणे जाणवत होतं.
 
 
त्या शिक्षकांच्या डोळ्यांत विद्यार्थ्यांबद्दल दिसणारा अभिमान हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा होता. कारण विद्यार्थ्यांनी कितीही मोठं व्हावं, कितीही उंच भरारी घ्यावी, शिक्षकांच्या मनात ती कायम त्यांचीच लेकरं राहतात.
 
 
या भेटीत मित्रांमध्ये कोण मोठं, कोण लहान, कोण शीमंत, कोण सामान्य असा कुठलाही भेद नव्हता. सगळे पुन्हा एकदा तेच निष्पाप शाळकरी मित्र झाले होते. जुन्या खोड्यांवर हास्याचे फवारे उडत होते. कोणी शिक्षकांच्या आठवणी सांगत होते, कोणी जुन्या फोटोंमागच्या गोष्टी आठवत होते. काहींच्या डोळ्यांत शब्दांविना बोलणारा आठवणींचा ओलावा दाटून आला होता.
 
 
यावेळी काढलेला समूह फोटो हा केवळ छायाचित्र नव्हताच. तो काळाच्या प्रवाहात हरवलेल्या मैत्रीचा पुन्हा सापडलेला ठेवा होता. त्या एका चित्रात कित्येक भावनांचे रंग दडले होते, यशाचं समाधान, भेटीचा आनंद, विरहाची हलकी वेदना आणि पुन्हा भेटण्याचं न बोललेलं वचन..!
 
 
कार्यक्रम संपल्यानंतरही काही शिक्षक स्वतः खाली वाकून रिकामे ग्लास उचलताना दिसले आणि तो क्षण मनाला खोलवर भिडून गेला. त्या क्षणी जाणवले मोठेपणा हा पदात नसतो तर तो संस्कारांत असतो, वागण्यात असतो आणि आयुष्यभर इतरांसाठी जगण्यात असतो.
 
 
राष्ट्रगीताच्या वेळी तर संपूर्ण वातावरणात एक वेगळंच पावित्र्य दाटून आले होते. शिक्षकांचा भारलेला आवाज, विद्यार्थ्यांच्या चेहèयावरचा अभिमान आणि डोळ्यांत दाटलेल्या भावना पाहताना जाणवले, शाळा ही केवळ शिक्षण देणारी जागा नसते, ती माणसाला माणूस बनवणारी संस्कारांची पवित्र भूमी असते.
 
 
आदर्श हायस्कूल हे फक्त नाव नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा संस्कारांचा दीप आहे. आज प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावला असला, तरी त्यांच्या यशाच्या मुळाशी या शाळेची शिदोरी आणि गुरुजनांचे आशीर्वादच आहेत, याची जाणीव प्रत्येकाच्या मनात दाटून आली.
 
 
आजचा हा स्नेहमिलन सोहळा म्हणजे केवळ भेट नव्हती तो हरवलेल्या पाखरांचा पुन्हा घरट्यात परतण्याचा क्षण होता आठवणींच्या ओलाव्यात न्हालेला. मैत्रीच्या सुगंधाने दरवळलेला आणि आयुष्यभर मनात जपून ठेवावा असा..!