खोदकामादरम्यान भूमिगत केेबल तुटली

-अशोक चौकातील घटना -ऐन उन्हाळ्यात विजेअभावी नागरिकांना फटका

    दिनांक :18-May-2026
Total Views |
नागपूर, 
cable-severed-during-excavation : विकासकामांसाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान दुलर्क्षामुळे जमिनीखालील केबल तुटून वीज पुरवठा ठप्प पडला. परिणामी याचा फटका 25 हजारांहून अधिक नागरिकांना बसला. ऐन 45 अंश सेल्सियस तापमानात त्यांंना उकाडा व मनस्ताप सहन करावा लागला.
 
 
CABLE
 
 
 
ग्रेट नाग रोडवरील अशोक चौक परिसरात विकासकाम सुरू आहे. सोमवारी दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास खोदकाम सुरू होते. त्याच्या दणक्याने जमिनीखालील केबल तुटली. महापारेषणच्या 132 केव्ही बेसा अतिरिक्तउच्चदाब केंद्रातून निघणारी महावितरणची ही 33 केव्ही आनंदम-उमरेड रोड फिडरची केबल होती.
 
 
या घटनेमुळे महावितरणच्या 33/11 केव्ही आनंदम व 33/11 केव्ही उमरेड रोड उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. आयुर्वेदिक महाविद्यालय परिसर, रेशीमबाग, सिरसपेठ, आवारी चौक, गणेशनगर, ओमनगर, आनंदनगर, नेहरूनगर, उमरेड रोड, तुळशीबाग तसेच गोदरेज आनंदम संकुल परिसरातील 25 हजाराहून अधिक ग्राहकांना फटका बसला.
 
 
नागपुरात सुमारे 45 अंश सेल्सियस तापमान असतानाच वीज नसल्याने नागरिकांना उकाड्याचा प्रचंड मन:स्ताप झाला. दरम्यान, महावितरण तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना तातडीने शोध सुरू केला. सुदैवाने केबल तुटली ती जागा लगेचच कळल्यानेे तंत्रज्ञांनी तेथे पोहोचून तातडीनेे दुरुस्ती काम केले. त्यामुळे अर्ध्या तासात वीज पुरवठा सुरू करता आला. मात्र, ऐन उन्हाळ्यात एवढा कालावधीही नागरिकांना त्रासदायक ठरला.
 
 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या कामादरम्यान केबलचे नुकसान झाल्याने ही समस्या निर्माण झाली होती, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.