फ्रान्स,
Cannes Film Festival फ्रान्समध्ये सुरू असलेल्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये यंदा मराठी चित्रपटसृष्टीचीही ठळक उपस्थिती पाहायला मिळाली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी या महोत्सवाच्या रेड कार्पेटवर पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जागतिक चित्रपटसृष्टीतील या भव्य सोहळ्यात मराठी संस्कृतीचा साज दिसून आल्याने महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात जगभरातील कलाकार अत्याधुनिक आणि आकर्षक वेशभूषेत सहभागी होत असताना अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मात्र पारंपरिक मराठमोळ्या पेहरावाला प्राधान्य दिले. अशोक सराफ यांनी पांढऱ्या रंगाचा आकर्षक सदरा आणि त्यावर शोभणारा पारंपरिक जॅकेट परिधान केला होता. तर निवेदिता सराफ यांनी पैठणी साडी आणि पारंपरिक दागिने परिधान करून मराठमोळ्या सौंदर्याची झलक सादर केली. त्यांच्या या वेशभूषेची सर्वत्र चर्चा सुरू असून सामाजिक माध्यमांवर त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत.या महोत्सवात केवळ अशोक आणि निवेदिता सराफच नव्हे तर इतर मराठी कलाकारांचीदेखील उपस्थिती दिसून आली. अभिनेत्री प्राजक्ता माळी, सामाजिक माध्यमांवरील व्यक्तिमत्त्व अंकिता वालावलकर तसेच अभिनेता पुष्कर जोग यांनीही या महोत्सवात सहभाग नोंदवला आहे. फ्रान्समधील भारत दालनामध्ये त्यांच्या उपस्थितीचे फोटो आणि चित्रफिती विशेष चर्चेत आहेत.
दरम्यान, या कलाकारांच्या Cannes Film Festival कान्समधील दैनंदिन घडामोडींचे काही हलकेफुलके चित्रफितीही समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत. एका चित्रफितीत निवेदिता सराफ यांनी केलेल्या मिश्किल संवादामुळे अशोक सराफ यांची विनोदी प्रतिक्रिया पाहायला मिळाली असून त्यामुळे चाहत्यांमध्ये हास्याचे वातावरण निर्माण झाले आहे.जागतिक व्यासपीठावर मराठी कलाकारांची वाढती उपस्थिती ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. पारंपरिक संस्कृतीचा सन्मान राखत आणि मराठमोळ्या ओळखीचा ठसा उमटवत या कलाकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीची वेगळी ओळख निर्माण केली आहे.