मुंबई
Dadar railway station मुंबईतील दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका इडली विक्रेत्याने खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी रेल्वे शौचालयाच्या पाण्याचा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्यानंतर प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दादर हे मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वे जंक्शनपैकी एक असून दररोज हजारो प्रवासी या परिसरातून प्रवास करतात. या प्रवाशांपैकी मोठ्या संख्येने लोक स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांकडून नाश्ता आणि खाद्यपदार्थ घेतात. अशा परिस्थितीत समोर आलेल्या या कथित प्रकारामुळे परिसरातील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या मानकांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
व्हायरल झालेल्या Dadar railway station व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला शौचालयाजवळील ड्रममधून पाणी घेऊन ते इडली तयार करण्यासाठी वापरताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.मात्र, या व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या पडताळलेली नाही. तरीही या घटनेनंतर रेल्वे प्रशासन, मुंबई महानगरपालिका (BMC) आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानक परिसरातील फेरीवाल्यांकडून अन्न तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळले जातात की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कठोर तपासणी आणि कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.