दर्यापूर,
cow-smuggling-vehicle : रविवारी मध्यरात्री दर्यापूर शहरातील बाभळी परिसरात अचानक दगडफेक झाल्याने तणावचे वातावरण निर्माण झाले होते. काही अल्पसंख्यांक नागरिकांनी अचानक दगडफेक केल्याचा आरोप झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करीत पुढील अप्रिय घटना रोखली. रविवारी रात्रीच्या वेळी एका वाहनात गावंश कोंबून कत्तलीकरिता नेल्या जात असल्याची माहिती मिळताच गोरक्षकांनी त्या वाहनाचा पाठलाग करून साडेअकराच्या सुमारास बाभळी येथील मोठ्या पुलावर वाहन पकडले. यावेळी दोन गटात तणाव निर्माण झाला. यावेळी जमावावर अचानक दगडफेक झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दर्यापूर शहरातून एका वाहनातून गोवंशीय जनावरे कोंबून नेत असल्याची माहिती मिळताच काही गोरक्षकांनी ते वाहन बाभळी येथील मोठ्या पुलावर पकडले. यावेळी जमावाची गर्दी वाढू लागली होती तसेच पोलिसांचे ११२ क्रमांकाचे वाहन सुद्धा घटनास्थळी पोहोचले, परंतु दोन गटात त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि एका बाजूने अचानक जमावावर तुफान दगडफेक झाली. यामध्ये आठ ते दहा जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे, मात्र याबाबत पोलिसांनी दुजोरा दिला नाही. यावेळी सुरुवातीला केवळ दोनच पोलिस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असल्याने अचानक दगदफेक झाल्याने ते सुद्धा हतबल झाले होते. त्यानंतर दर्यापूर ठाणेदार सुनील वानखडे व इतर कर्मचारी येताच त्यांनी उपस्थित जमावाला पांगविले. तसेच गोवंश व वाहन ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत बाभळी पुलाजवळ पोलिसांची गस्त होती. सोमवारी दोन गटातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे; मात्र, त्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. दर्यापूर शहरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून उपविभागीय पोलिस अधिकारी कुळकर्णी व ठाणेदार सुनील वानखडे लक्ष ठेवून आहेत.