चेन्नई.
Dhoni Injured Again चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार एम. एस. धोनी पुन्हा एकदा दुखापतीमुळे चर्चेत आला आहे. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात धोनी खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. सराव सत्रात सहभागी होत असतानाही तो प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती, मात्र ताज्या वृत्तांनुसार त्याच्या अंगठ्याला नवीन दुखापत झाली असून तो या सामन्याबाहेर राहणार आहे. आयपीएलच्या या हंगामाच्या सुरुवातीपासूनच धोनी कॅल्फ स्ट्रेनमुळे काही सामन्यांपासून दूर होता. २८ मार्च रोजीच फ्रँचायझीने त्याच्या दुखापतीबाबत माहिती देत तो काही काळ मैदानाबाहेर राहील असे स्पष्ट केले होते. त्यानंतरही काही सामन्यांमध्ये तो संघासोबत सराव करताना दिसला, मात्र प्रत्यक्ष मैदानात खेळताना दिसला नाही.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा फॉर्म हळूहळू सुधारत असून संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. अशा निर्णायक टप्प्यावर धोनीची अनुपस्थिती संघासाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्याचवेळी चेपॉकवरील हा सामना यंदाच्या हंगामातील चेन्नईचा घरच्या मैदानावरील शेवटचा सामना असल्याने धोनीच्या उपस्थितीबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. धोनीने काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात संकेत दिला होता की त्याचा शेवटचा टी-२० सामना चेपॉकमध्येच असेल. त्यामुळे या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र पुन्हा एकदा दुखापतीमुळे त्याची अनुपस्थिती निश्चित झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.