मुंबई
Kap Bashi पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक विचारांचा अनोखा तडका देणारा ‘कप बशी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अनोख्या आणि विनोदी कथानकावर आधारित या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, येत्या 19 जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. टीझर प्रदर्शित होताच चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘कप बशी’ची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने केली असून कल्पक सदानंद जोशी हे चित्रपटाचे निर्माते आहेत. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश रामगोपाल राठी यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले असून दिग्दर्शनाची धुरा वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांनी सांभाळली आहे.
या चित्रपटाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील पहिले पाऊल. त्यांच्या सुमधुर संगीताची साथ या चित्रपटाला लाभली आहे. गीतकार गुरु ठाकूर यांनी गीते लिहिली असून बाळू दहिफळे यांनी छायांकन केले आहे. चित्रपटाचे संकलन आशिष म्हात्रे यांनी केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी संयोजन, तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीकांत देसाई यांनी लूक डिझायनर म्हणून काम पाहिले आहे.
चित्रपटाच्या तांत्रिक Kap Bashi बाजूसोबतच कलाकारांची फळीही तितकीच दमदार आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित अभिनेता ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे आणि उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी या चित्रपटातून प्रथमच प्रेक्षकांसमोर येत आहे.चित्रपटाची कथा पारंपरिक विवाह पद्धतीभोवती फिरणारी असली तरी त्यात आधुनिक विचारांची भन्नाट मांडणी करण्यात आली आहे. लग्न जमवताना नवरा-नवरीच्या पत्रिका जुळवण्याची प्रथा सर्वश्रुत आहे. मात्र, या चित्रपटात उच्चशिक्षित नवरी होणाऱ्या सासूसमोर एक वेगळीच अट ठेवते. नवरा-नवरीच्या पत्रिकेसोबत सासू आणि सुनेची पत्रिकाही जुळली पाहिजे, अशी तिची अट असते. या अटीनंतर घडणाऱ्या गमती-जमती आणि कौटुंबिक नात्यांमधील हलक्याफुलक्या घडामोडींवर आधारित ही कथा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.चित्रपटाचा टीझरही कथानकाची उत्सुकता वाढवणारा ठरला आहे. खुसखुशीत संवाद, विनोदी प्रसंग आणि कौटुंबिक नात्यांमधील भावनिक पैलू यांची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. पारंपरिक मूल्ये आणि आधुनिक विचारांचा संगम असलेला ‘कप बशी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार असल्याची चर्चा सध्या मराठी चित्रपटसृष्टीत रंगत आहे.