विधान परिषदेचा अमरावती रणसंग्राम सुरू

-स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ -मोर्चेबांधणीला येणार वेग

    दिनांक :18-May-2026
Total Views |
अमरावती, 
legislative-council-amravati : विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सोमवारी जाहीर झाली. अमरावती मतदारसंघाची निवडणूक गेल्या दोन वर्षापासून लांबली होती. इच्छुक या निवडणुकीची चातकासारखी वाट पाहत होते. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे, पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य व १४ पंचायत समितीचे सभापती मतदानात सहभागी होणार नाही. कारण, दोन्ही निवडणुका झालेल्या नाही.
 
 
K
 
 
 
गेल्या अनेक वर्षापासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. जगदीश गुप्ता भाजपात असताना सलग दोनदा व त्यानंतर प्रवीण पोटे २०१२ व २०१८ निवडणुकीत विजयी झाले. २०२४ मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते. पण, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्याने उपरोक्त निवडणुक होऊ शकली नाही. डिसेंबर मध्ये जिल्ह्यातल्या १० नगर परिषद व ४ नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर जानेवारीत महानगर पालिका निवडणुक आटोपल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाही. पण, नियमानुसार ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार संख्या झाल्यामुळे ही निवडणुक घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे ५९ व पंचायत समितीचे १४ सभापती असे ७३ मतदार वगळून नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगर पालिकेचे मिळून जवळपास ४०० पेक्षाजास्त मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहे.
 
 
भाजपातर्फे प्रवीण पोटे व डॉ. नितीन धांडे यांनी उमेदवारी मागितली आहे. दोघांची तयारी जोरात सुरू आहे. काँग्रेसकडे अजूनही कोणी जाहीरपणे उमेदवारी मागितली नाही. या निवडणुकीचा पूर्व इतिहास बघता काँग्रेस इच्छुकांच्या मनात कमालीचा संशय आहे. अर्थकारणावर खेळली जाणरी ही निवडणूक आहे. महायुती म्हणून भाजपाकडे बहुमत आहे. भाजपाचे हक्काचे जवळपास १४० मतदार आहेत. त्या खालोकाल काँग्रेसकडे व अन्य पक्षांकडे मतदार आहे. महाविकास आघाडी म्हणून बहुमत होत नाही. रणसंग्राम सुरू झाला आहे. लवकरच चित्र स्पष्ट होईल. भाजपा व काँग्रेस कोणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.