मुंबई,
IPS transfer महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने गेल्या काही दिवसांपासून बदल्यांचा धडाका सुरू असताना, गृह विभागाने रविवारी मुंबई पोलीस दलात पुन्हा मोठे फेरबदल केले आहेत. या निर्णयानुसार अनेक वरिष्ठ पोलीस उपायुक्तांच्या (DCP) बदल्या करण्यात आल्या असून, विविध परिमंडळांमध्ये नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईतील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत ठेवणे, गुन्हे नियंत्रणात ठेवणे तसेच प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणणे या उद्देशाने हे बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (एन) (२) अंतर्गत गृह विभागाने हे अधिकृत आदेश जारी केले आहेत.या बदल्यांमध्ये परिमंडळ ८ चे डीसीपी मनीष कलवानिया यांची बदली परिमंडळ १ मध्ये करण्यात आली आहे. परिमंडळ ४ च्या डीसीपी राघासुधा आर. यांच्याकडे आता परिमंडळ २ ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष कृती दलातून निमित्त गोयल यांची परिमंडळ ८ च्या नवीन उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच परिमंडळ २ चे डीसीपी मोहित कुमार गर्ग यांची बदली परिमंडळ ९ मध्ये करण्यात आली असून, राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत असलेले संदीप घुगे यांची मुंबईतील परिमंडळ ११ चे उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. तर ‘फोर्स वन’मधील पोलीस अधीक्षक गजानन राजमाने यांच्याकडे परिमंडळ १२ च्या डीसीपी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबईसारख्या IPS transfer अत्यंत संवेदनशील आणि लोकसंख्येने घनदाट शहरात कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन आणि वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे हे मोठे आव्हान मानले जाते. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे पोलीस यंत्रणेला अधिक बळ मिळेल आणि प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.