14 वर्षांनंतर शेखर सुमन यांचे पुनरागमन

    दिनांक :18-May-2026
Total Views |
मुंबई
Shekhar Suman तब्बल चौदा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अभिनेते आणि सूत्रसंचालक शेखर सुमन यांनी ‘शेखर टुनाईट’ या नव्या शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर दमदार पुनरागमन केले आहे. यावेळी त्यांनी डिजिटल माध्यमाची निवड करत यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा नवा प्रयत्न केला आहे. आपल्या खास शैलीतील विनोद, स्पष्टवक्तेपणा आणि संवेदनशील संवादशैलीसाठी ओळखले जाणारे शेखर सुमन यांनी या नव्या पर्वाची सुरुवात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केली.
 

Shekhar Suman 
पहिल्याच भागात भाषा, संस्कृती, राजकारण, सार्वजनिक जबाबदारी आणि ‘विविधतेत एकता’ या संकल्पनांवर सखोल चर्चा रंगली. महाराष्ट्र आणि मराठी भाषेबद्दल बोलताना नितीन गडकरी यांनी राज्याबाहेर अधिक काळ घालवल्यानंतर मराठी संस्कृतीचे खरे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवल्याचे सांगितले. मराठी भाषा, साहित्य, नाटक, संगीत आणि सांस्कृतिक परंपरांविषयी अभिमान व्यक्त करत त्यांनी मराठी ओळख ही केवळ भाषेपुरती मर्यादित नसून ती सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक असल्याचे नमूद केले.
या संवादादरम्यान शेखर सुमन यांनी अलीकडेच चर्चेत आलेल्या मराठी भाषेसंदर्भातील वादाचा उल्लेख करत हलक्याफुलक्या शैलीत भाष्य केले. मराठी न बोलणाऱ्या व्यक्तींना रिक्षा किंवा स्कूटर चालवण्यासंदर्भातील चर्चेमुळे विशेषतः बिहारमधून आलेल्या लोकांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे त्यांनी विनोदी अंदाजात सांगितले. त्यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी बिहारमधील पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख करत, कोणत्याही राज्यातील नागरिकांविरोधात भेदभाव करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले.भाषेविषयी आपुलकी असणे स्वाभाविक असले तरी ती भावना अतिरेकी किंवा हटवादी स्वरूपाची होता कामा नये, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. एखाद्या प्रदेशात काम करायचे असल्यास तेथील भाषा शिकणे ही सकारात्मक बाब असल्याचे सांगताना त्यांनी प्रत्येक भाषेला तिच्या साहित्य आणि संस्कृतीचा अभिमान असायलाच हवा, असेही नमूद केले.
‘शेखर टुनाईट’ या शोची Shekhar Suman  निर्मिती अध्ययन सुमन यांनी केली असून धर्मेश सांगाणी हे या कार्यक्रमाचे निर्माते आहेत. शेखर सुमन यांची खास संवादशैली, विनोदबुद्धी आणि भावनिक स्पर्श यांचा संगम या कार्यक्रमातून पुन्हा अनुभवायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये या शोबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रभावी पाहुणे, समकालीन विषयांवरील चर्चा आणि मनोरंजनाचा अनोखा संगम यामुळे ‘शेखर टुनाईट’ हे केवळ पुनरागमन नसून एक वेगळा अनुभव ठरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.