आळेफाटा
ST bus accident अहिल्यानगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावर बेल्हे येथील गुंजाळवाडी फाटा परिसरात घडलेल्या भीषण एसटी बस अपघाताचा नवा तपशील समोर आला आहे. पावसाळी वातावरणात भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या अपघातात बस चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून सुमारे 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत.
भिवंडी डेपोची ही एसटी बस अहिल्यानगरहून कल्याणच्या दिशेने जात असताना बेल्हे परिसरात आली असता अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात कोसळली. अपघात इतका भीषण होता की बस पलटी होऊन तिचे चाके वर झाले. बसचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. मोठ्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी खिडक्या आणि दरवाजे तोडण्यात आले. जखमींना तातडीने आळेफाटा येथील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ST bus accident बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी होते आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दी अधिक होती. चालकाच्या बेदरकार वाहन चालवण्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी नमूद केले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास स्थानिक पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.